सासऱ्याने अतिक्रमण केल्याने सूनबाईला गमवावे लागले सरपंचपद : सरपंचपदासह सदस्यत्वही रद्द

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पिंपोडे बुद्रुक : प्रतिनिधी
अनपटवाडी (ता. कोरेगाव ) येथील सरपंच रुपाली प्रशांत मुळीक यांना अतिक्रमण केल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी अपात्र ठरवले आहे. 
                   याबाबत अधिक माहिती अशी, जानेवारी २०२१ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेनंतर रुपाली मुळीक यांची सरपंचपदावर वर्णी लागली होती. सासरे प्रकाश मुळीक व रुपाली मुळीक हे एकत्र कुटुंबात राहतात. सासऱ्यांच्या नावे असलेल्या मिळकत क्रमांक १५३ मध्ये वीर तानाजी चौक -- दत्त मंदिर ज्योतिबा मंदिरमार्गे नवीन पाण्याची टाकी या रस्त्याच्या पश्चिमेला ४.५ × ५ फूट शौचालयाचे बांधकाम करून सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. याच रस्त्याच्या पूर्वेस त्यांनी ५ × ५३ फूट सिमेंट वीट कंपाऊंडचे बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. याबाबत त्यांना एक नोव्हेंबर २०१८ आणि चार ऑगस्ट २०२० रोजी ग्रामपंचायतीने नोटीस देऊन अतिक्रमण काढण्यास सांगितले होते.तसेच त्यांनी मिळकत क्रमांक ३५० मध्ये राऊतवाडी - अनपटवाडी - शहापूर - दहिगाव या जिल्हा परिषद रस्त्यावर ग्रामपंचायत ते पावनाई देवी मंदिर रस्त्यादरम्यान ३० × १० फूटाचे पत्रा शेड उभारून त्यामध्ये दूध डेअरीचा कूलर बसवून सार्वजनिक रस्ता व गटारावर अतिक्रमण केले आहे. मिळकत क्रमांक ३५०/१ मध्ये ग्रामपंचायत ते पावनाई देवी मंदिर रस्त्यालगत २३ × ५ फूट लांबीरुंदीचे दगड , वीट , सिमेंटचे पक्के बांधकाम करून रस्ता व गटारावर अतिक्रमण केले आहे.याबाबत भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व माजी सरपंच मनोज अनपट यांनी .मुळीक यांच्या विरोधात तक्रार अर्ज केला होता. तो ग्राह्य मानून जिल्हाधिकाऱ्यांनी  रुपाली मुळीक यांना ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (ज-३) व कलम १६(२) अन्वये बुधवारी (ता.आठ) रोजी अपात्र ठरवले आहे. अशिलातर्फे अँड. किशोर खराडे यांनी काम पाहिले.
To Top