सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम (ता. बारामती) ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच संजयकुमार शिंगटे यांनी गायरान जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार ग्रामपंचायतीचे सदस्य प्रशिल प्रकाश जगताप आणि संकेत दिलीप जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यामुळे सरपंच संजयकुमार शिंगटे यांचे सरपंचपद धोक्यात आले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंगटे हे जनतेतून निवडून येत सरपंच झाले आहेत. अतिक्रमणामुळे ग्रामपंचायतीचे सदस्य व सरपंच अपात्र होत असल्याच्या अनेक घटना राज्यात घडल्या आहेत यात आता मुरूमच्या सरपंचाची भर पडण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशिल आणि संकेत जगताप यांनी शुक्रवारी(दि.२४) पत्रकार परिषदेत अतिक्रमणाबाबत माहिती दिली.
शिंगटे यांनी निवडणूक अर्जात अतिक्रमण नसल्याचे घोषणापत्र दिले होते. मात्र गट क्रमांक ३८ मधील ६० आर क्षेत्रात अतिक्रमण केले असून यामध्ये गणेश विट केंद्र या नावे वीटभट्टी असल्याचे जगताप यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय गायरान जागेत पाण्याची टाकी, पत्र्याच्या पाच खोल्या तसेच वीटांकरता ५०० ब्रास माती आणून ठेवली आहे. सन २००६ पासून या गायरान जागेत त्यांनी अतिक्रमण केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदर अतिक्रमण काढावे यासाठी ग्रामसेवक यांनी नोटीसही दिली आहेत. याबाबत मंडालाधिकारी, तहसीलदार यांच्याकडेही तक्रार देण्यात आली असून त्यांनी याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.गट क्रमांक १२७ मध्ये संजय शिंगटे यांचे वडील नामदेव शिंगटे यांनी ८० आर क्षेत्रामध्ये अतिक्रमण केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
गायरान जागेत केलेल्या अतिक्रमणाची नोंद नमुना क्रमांक १ ई अतिक्रमण नोंद वहीत नमूद असून त्यामध्ये संजय शिंगटे यांचे नाव असून याचा वापर वीटभट्टीसाठी करत असल्याचे सांगितले आहे. ग्रामपंचायतीने गायरान जागेत अतिक्रमण केलेल्यांची
यादी तयार केली असून शिंगटे यांचे नाव आहे. नामनिर्देशन पत्रासोबत खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करून शासनाची व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची फसवणूक केली असल्याने सरपंच संजय शिंगटे यांना अपात्र करावे अशी मागणी प्रशिल आणि संकेत जगताप यांनी केली आहे.
......................
सरपंच घेत नाहीत फोन.
मुरूमच्या सरपंचपदी संजयकुमार शिंगटे हे सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर क्वचितच ग्रामपंचायत कार्यालयात गेले आहेत. गत महिन्यात ग्रामस्थांना पाच दिवस पिण्याचे पाणी नव्हते. अनेक ग्रामस्थांनी फोन करूनही ते फोन घेत नसल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत. तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वीटभट्टीवर सह्या करण्यासाठी बोलावले जात असल्याचा आरोपही ग्रामस्थ करत आहेत.
.....................
आरक्षण नसताना निवडणूक लढवली.
मुरूम ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपद हे ओबीसी साठी राखीव होते. मात्र कुणबीचा दाखला मिळवत शिंगटे यांनी मुळ ओबीसींवर अन्याय करत निवडणूक लढवली आणि निवडून आले. मात्र गायरान जागेत मोठे अतिक्रमण असूनही त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे.
.........................
पॅनेल प्रमुखांची अडचण.
डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मल्लिकार्जुन स्वाभिमानी गावकरी पॅनेल व मल्लिकार्जुन स्वाभिमानी गावकरी परिवर्तन पॅनेल मध्ये जोरदार लढत झाली होती. परिवर्तन कडून ७ तर गावकरी पॅनेल कडून ६ सदस्य निवडून आले होते. मात्र सरपंचपद मिळूनही गावकरी पॅनेलचे सरपंचांवर अपात्रेची टांगती तलवार असल्याने पॅनेल प्रमुखांची अडचण वाढली आहे.
-------------
संजय शिंगटे : सरपंच मुरूम
जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होऊन जो निकाल होईल तो मान्य राहिल. माझ्या नावे कधीही नोटीस आलेली नाही किंवा मी गायरानाची कधीही मागणी केली नाही. वीटभट्टी गायरानात नसून लगतच्या गट क्रमांक ३९ मध्ये सुमन नामदेव शिंगटे यांच्या नावे आहे. संबंधित खोल्याही गरीबांच्या आहेत त्यांनी ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी नोंदीसाठी मागणी केली आहे. माझे व आईवडिलांचे रेशन कार्ड वेगळे असून विभक्त आहोत. गट क्रमांक १२७ च्या लगतचे क्षेत्र वडिलांनी विकलेले आहे त्याच्याशीही संबंध नाही. उलट सर्व गायरान गटांचे चाळीस हजार रूपये भरून सरकारी मोजणी मागविण्यासाठी आम्हीच पुढाकार घेतला आहे. मोजणी झाल्यांतर ज्यांच्या नावावर सातबारा आहे अशा लोकांची घरे जमीनदोस्त करणार आहोत. तसेच गावठाण जमीनही मोजायची असून विविध रस्त्यांमध्ये येणारी अतिक्रमणेही काढणार आहोत. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्जही केलेला आहे. या तक्रारीमुळे पोटशूळ उठल्याने संबंधितांनी माझ्याविरूध्द राजकीय व्देषापोटी तक्रारी केल्या आहेत. मी जनतेतून सर्वाधिक मतांनी निवडून आलो आहे. गावात चार-पाच दिवस पाणी नव्हते कारण संबंधित डीपीवरील सत्तर टक्के बिले आल्याशिवाय डिपी चालू करणार नाही असे वीजकंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यात ग्रामपंचायतीचा दोष नाही