सोमेश्वर रिपोर्टर टीम---- ---
नीरा : प्रतिनिधी
सह्याद्री खोऱ्यात अरोहणासाठी आव्हानात्मक मानला जाणारा मोरोशीचा भैरवगड पारंपारिक मार्गाने सर करीत स्वराज्य ट्रेकर्स आणि टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तिरंगा राष्ट्रध्वज फडकावित वंदन केले.
या मोहिमेची सुरुवात मोरोशी गाव, ता.मुरबाड, जि.ठाणे येथून झाली. घनदाट जंगलातुन दोन तासांची पायपीट केल्यावर गडाच्या पायथ्याशी पोहोचता येते.
येथुन गडावर जाणाऱ्या कातळ कड्यावर कोरलेल्या पायऱ्या आहेत. पुढे सर्वात कठीण ओव्हरहँगचा टप्पा गिर्यारोहकांची परीक्षा घेणारा आहे. हा टप्पा पार करताना पायरीमार्ग निमुळता होत जात शेवटी अगदी नष्ट होऊन जातो. यामुळे हा टप्पा पार करताना सरळ न जाता आडवे जावे लागते व खडकात हातांच्या व पायांच्या बोटांची मजबुत पकड करून प्रस्तरारोहण करावे लागते. पुढे पायरीमार्ग संपल्यावर दोन पाण्याच्या टाक्यांच्या पुढील वाट निवडुंगाच्या जाळीतुन पुर्व पश्चिम पसरलेल्या अरुंद गडमाथ्यावर घेऊन जाते.
रांगडे रूप असणारी ४०० फुट उंच अजस्त्र कातळ भिंत, काळजाचा थरकाप उडवणारी चित्तथरारक चढाई, सरळसोट कातळकडा, अंगावर येणारा ओव्हरहँग आणि निमुळत्या, निसरड्या पायऱ्या आणि एका बाजुला खोल दरी अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात बनी शिंदे, जॅकी साळुंके, भारत वडमारे, यश पवार, शुभम अहिरे, संकेत जाधव, अक्षय कातोरे, सज्जन ताकतोडे, समीर रहाणे, शरद रोळे, भागवत यादव, अरूण देशमुख, दिव्यांग जनार्धन पानमंद आणि डॉ.समीर भिसे यांनी मोहीम सुरक्षितपणे फत्ते केली.
COMMENTS