बारामती ! 'या" तारखेला राज्यातील शेतकऱ्यांचा पायी मोर्चा धडकणार महसूल मंत्र्यांच्या लोणी येथील कार्यालयावर : बारामती, पुरंदर, दौंड येथून शेकडो शेतकरी होणार सहभागी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
बारामती :प्रतिनिधी
शेतकरी, शेतमजूर, श्रमिकांच्या मागण्यांसाठी, किसानसभेच्या नेतृत्वाखाली २६ एप्रिल ते २८ एप्रिल २०२३ या काळात अकोले ते लोणी,जिल्हा अहमदनगर असे तीन दिवसांच्या पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.राज्याचे महसूल मंत्री,राधाकृष्ण विखे पाटील,यांच्या लोणी येथील कार्यालयावर,हा राज्यव्यापी मोर्चा निघत आहे.
             राज्यभरातील शेतकरी वर्गाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी हा पायी मोर्चा निघत आहे.सदरील  मागण्या मान्य न झाल्यास पायी मोर्चानंतर,दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलन सुरू केले जाणार आहे.
           या पायी मोर्चात अत्यंत महत्वपूर्ण एक मागणी आहे ती म्हणजे देवस्थान,इमान वर्ग-३ जमिनी कसणारांच्या नावे करा.राज्यात वर्षानुवर्षे देवस्थान,इमान वर्ग-३ जमिनी वर्षानुवर्षे कसणारा शेतकरी हा आज बेदखल केला जात आहे.व त्याला कोणत्याही शासकीय योजना वा सुविधा मिळत नाही.त्यामुळे वर्षानुवर्षे जमिनी कसणारे शेतकरी यांची कसत असलेल्या जमिनींची नोंद, मालकी हक्कात मुख्य कब्जेदार म्हणून करा.या मागणीला घेवून बारामती,पुरंदर,दौंड येथील शेकडो शेतकरी या पायी मोर्चात सहभागी होत आहे.
                 नुकतेच बारामती तालुक्यात मुढाळे येथे बारामती,दौंड,पुरंदर येथील देवस्थान,इमान वर्ग-३ चे शेतकरी यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात किसान सभा,पुणे जिल्हा समितीचे जिल्हा अध्यक्ष,डॉ.अमोल वाघमारे यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी हे नमूद केले की, ‘ किसान सभेच्या नेतृत्वाखाली नुकताच झालेला नाशिक ते मुंबई या लॉंग मार्च वेळी सरकार सोबत, संघटनेच्या प्रतिनिधी यांची पार पडलेल्या बैठकीत,देवस्थान इमान वर्ग-३ व वक्फच्या जमिनी कसणारांच्या नावे करणारा कायदा करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या आश्वसनाची पूर्तता व्हावी व कायदा करताना शेतकरी वहिवाटदारांचे हितरक्षण व्हावे यासाठी हा पायी मोर्चा निघत आहे.”
             यावेळी उपस्थित बारामती,पुरंदर व दौंड येथील शेतकरी बांधवांनी एकत्रित येवून आपल्या हक्काचा लढा पुढील काळात लोकशाही मार्गाने मोठ्या ताकदीने लढायचा असा निर्धार केला. यावेळी शेतकरी,हमीद इनामदार, अजगर इनामदार महेबूब इनामदार,सिराज मुजावर, खुद्बुद्दीन मुजावर, कासम मुजावर,वाहिद मुजावर, लियाकत मुजावर,खुशरोद्दीन मुजावर, लियाकत मुजावर,
उमेश गुरव, अरुण गुरव, सदानंद कापरे, नवनाथ भोंगळे इ.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
To Top