बारामती ! करंजेपुलच्या ग्रामसेविका आठवड्यातून दोनदा येतात ...ते पण फक्त १२ ते २ यावेळेत ..कसा चालणार गावाचा कारभार ? गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपूल येथे निवडणुकीअभावी प्रशासक असल्याने ग्रामसेवकांकडे कारभार आहे. मात्र तीन महिन्यात ग्रामसेविका सुजाता आगवणेंकडून एकही प्रस्ताव दाखल नाही. घरकुलांचे प्रस्तावही पडून आहेत. कचरा-घंटागाडीचे कामकाज ठप्प आहे. कारण त्या आठवड्यातून दोनच दिवस येतात, अशी तक्रार मावळते सरपंच वैभव गायकवाड यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. तसेच, ग्रामंपचायतीच्या पाणीपुरवठ्याची कालव्यावरून येणारी पाईपलाईन पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने फोडली. त्याच्याकडून भरपाई घेण्याऐवजी ग्रामपंचायतीवर पन्नास हजारांपेक्षा अधिकचा बोजा टाकला, अशेही निदर्शनास आणून देत त्यांच्या बदलीची मागणी केली आहे. 
करंजेपूल ग्रामपंचायतीत १८ जानेवारीपासून सदस्यांची मुदत संपल्याने प्रशासकाच्या हाती कारभार गेला आहे. प्रशासकांना अनेक गावे असल्याने ते फिरकत नाहीतच. पण कारभारास संपूर्ण जबाबदार असणाऱ्या ग्रामसेवकांनीही दुर्लक्ष केले तर विकासाचा गाडा कसा अडकतो हे प्रातिनिधिक स्वरूपात समोर आले आहे. 
पत्रकार परिषदेत बोलताना सरपंच गायकवाड म्हणाले, दोन वर्षांपासून त्या करंजेपूलला आहेत. माझ्याकडे कार्यभार असतानाही अनियमितच येत होत्या. आम्हीच कामे पुढे न्यायचो. मात्र आता बारामतीतून येऊन जाऊन करत असून प्रशासकीय कामास वेळ देत नाहीत. महिला असल्याने त्यांना सूचना देण्यास मर्यादा येतात. कचरागाडी तीन महिने बंद असून त्यावरील चालकाचे वेतनही त्यांना देणे शक्य झाले नाही. स्वतःच्या चुका झाकण्यासाठी अनेक वर्ष कार्यरत असलेल्या सेवकांना काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. घरकुल योजना सुरू झालेल्या लाभार्थ्यांचा दुसरा हप्ता आला नसल्याने कामे ठप्प आहेत. नव्या घरकुलांचे, कृषी योजनांचे अथवा कुठल्याच कामाचा प्रस्ताव दिलेला नाही. 
ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना पाईपलाईन कालव्यावरील पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून फुटली. आम्ही संबंधित ठेकेदारास स्वतः काम करण्यास तयार केले होते. मात्र ग्रामपंचायतीमार्फत पन्नास हजारांपेक्षा अधिक खर्च करून ती दुरूस्ती केली. सामान्यांच्या पैशाचा अपव्यय झाल्याने ठेकेदाराकडून वसुली करावी. महिनाभर ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवल्याने लोकांची गैरसोय झाली. त्यामुळे सदर महिला ग्रामसेवकांची बदली करून नवे ग्रामसेवक द्यावेत, अशी मागणीही केली आहे. 
याबाबत गटविकास अधिकारी अनिल बागूल यांनी, याबाबत अधिकची माहिती घेऊन सोमवारी प्रतिक्रिया देतो असे सांगितले.
------------ ------------
पंचायत समिती मध्ये तसेच तहसीलदार कार्यालयात ग्रामपंचायत संदर्भातील कामे असतात. प्रशासकीय काळ असल्याने प्रशासकाना भेटून यावे लागते.घंटागाडी चालू असताना शासनाने ठरवून दिलेली धून वाजवणे बंधनकारक असते. तसेच पाणी पुरवठा योजनेबाबत नीरा डाव्या कालव्यावर पुलाचे काम सुरू होते. तिथल्या ब्रेकर मुळे अनेकवेळा पाईपलाईन फुटल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहिला. 
सुजाता आगवणे
ग्रामसेविका
To Top