सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
"त्याने त्याचं आजवरचं आयुष्य गोरगरिबांच्या सेवेसाठी वाहिलं. आज तो निम्म्या वयाचा आहे. घरकुल , अतिक्रमण प्रश्न यासाठी तो मार्गदर्शक झाला. हजारो लोकांचे विवाद सोडवले. मोफत जनसेवा केली. स्पर्धा परीक्षा ग्रंथालय उभारून गोरगरिबांच्या मुलांना मोफत अभ्यासिका उपलब्ध करून दिली. बहुजन संघटना उभ्या केल्या. एका प्राथमिक शिक्षकाने केलेले लोकोपयोगी काम अचंबित करणारे आहे." असे प्रतिपादन राष्ट्रवादी प्रदेश प्रतिनिधी कांचन निगडे यांनी केले.
गुळुंचे (ता.पुरंदर) येथील प्राथमिक शिक्षक प्रवीण जोशी यांच्या माणुसकीचा गाव या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी माणदेशाकडून जोशी यांना 'दीनमित्र' ही उपाधी बहाल करण्यात आली.
यावेळी शिक्षण उपासंचालक देविदास कुलाळ, प्रा. व. बा. बोधे, भरत निगडे, सुधीर निगडे व प्राथमिक शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान, भरत निगडे म्हणाले, " जोशी यांनी आजवर समाजासाठी केलेले कार्य पाहता त्यांना मिळालेली उपाधी सार्थ आहे. पुरंदरच्या सुपुत्राचा हा सन्मान दिशादर्शक आहे."
यावेळी शेखर खताळ म्हणाले, "गाव अडचणीत असताना जोशी गुरुजी आमच्या पाठीशी खंबीर उभे होते. केवळ एक शिक्षक म्हणून नव्हे तर गावचा आधारवड म्हणून त्यांनी गावात काम केले आहे. त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज चांगल्या पदावर आहेत. त्यांच्या कार्यकाळात शाळेचा विकास होऊन शाळेला पुरस्कार मिळाले. असा शिक्षक लाभणे दुर्मिळ." हनुमंत जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. विनायक पानसांडे व दिगंबर बामणे यांनी नियोजन केले. श्रीकांत दोरगे यांनी आभार मानले.