सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
वाहतुकीसाठी धोकेदायक असलेल्या पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील अपघाताचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. आज बुधवारी सकाळी जेजुरी नजीक भोरवाडी फटा येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने एक टेम्पो थेट पुणे मिरज लोहमार्गावर जाऊन पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी अथवा मृत्यू झाला नाही.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जेजुरी औद्योगिक वसाहत सोडल्यानंतर भोरवाडी फाट्यापासून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग हा एकेरी होतो. याच दरम्यान भरधाव टेम्पो जेजुरीकडून नीरा बाजूकडे भरधाव निघाला होता. चारपदरी रस्ता अचानक एकेरी झाल्याने टेम्पो चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. वेगात असलेल्या टेम्पो थेट रस्त्याच्या डाव्या बाजूने दगड गोट्यातून रस्त्याच्या लगत असणाऱ्या पुणे मिरज रेल्वे लाईन वर जाऊन पलटी झाला. या टेम्पोमध्ये ब्रिटानिया कंपनीचे बिस्किटचे बॉक्स होते. मोठ्या उंचीवरून हा टेम्पो खाली पडला.सुदैवाने टेम्पो चालक मात्र सुखरूप बाहेर आला. तो किरकोळ जखमी आहे. सचिन सखाराम कारंडे अस चालकाच नाव असून तो पुण्यातील सहजपुरवाडी येथील रहिवाशी आहे.
----------------
धोकादायक पालखीमार्ग
थोड्याच दिवसात या धोकेदायक पालखी मार्गावरून लाखो वैष्णवांचा मेळा जाणार आहे. या सोहळ्याच्या तयारीसाठी पुण्याचे जिल्हाधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक, बांधकाम, आरोग्य विभागाचे अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी या रस्त्यांवरून आपल्या उन्हाळी अर्थात पालखी सोहळा पूर्व सहली काढल्या . दरवर्षी पालखी सोहळ्यापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाकडून अशा उन्हाळी सहली पुणे ते नीरा शहरापर्यंत काढल्या जातात. मात्र, गेली दहा ते बारा वर्षे झाले या रस्त्याचे रुंदीकरण अथवा धोकेदायक ठिकाणे काढण्याचा कुठल्याही प्रयत्न केला नाही.पालखी गेल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी अपघाताचे सत्र तसेच राहते ही बाब गंभीर असल्याचे लोक आता बोलून दाखवत आहेत. मात्र अधिकारी आणि राजकीय पुढारी याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात.
COMMENTS