बारामती ! नीरा खोऱ्यातील शेतातील मातीची कॅन्सरसारखी अवस्था : डॉ. प्रमोद जगताप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मातीला वय असते हे शेतकऱ्यांना माहिती नसते त्यामुळे मातीचे आरोग्य याबाबत शेतकऱ्यांनी माहिती घ्यावी. निरा खोऱ्यातील वीर धरण व निरा डाव्या कालव्याशेजारील जमिनींची कॅन्सर सारखी अवस्था झाली आहे. यासाठी जमिनीचा पोत सुधारणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना ऊसाच्या पिकातील सगळ समजत असा गैरसमज आहे. तो काढून शेतकऱ्यांनी जमिनीचे आरोग्य जपावे असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद जगताप यांनी केले. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सोमेश्वर कारखाना कार्यस्थळावर ऊस पिक परिसंवाद व कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, संचालक संग्राम सोरटे, अभिजित काकडे, ऋषीकेश गायकवाड, सर्व संचालकमंडळ, अधिकारी बापुराव गायकवाड, विराज निंबाळकर तसेच शेतकरी सभासद उपस्थित होते. 
      जगताप पुढे म्हणाले की, शेतकरी उसाची जात विचारतात मात्र जमिन व मातीचे प्रश्न विचारत नाहीत. मातीचे आरोग्य जमिनीची सुपीकता आणि जमिनीची उत्पादकता यावर अवलंबून आहे. सुपिक जमीन उत्पादक असतेच असे नाही. जैविक सुपीकता, भौतिक सुपीकता, रासायनिक सुपीकता याची वर्गवारी करून त्यांनी सोप्या भाषेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.खनिज पदार्थ, पाणी, हवा, 
जमिनीची सुपिकता कमी होण्याची कारणे आदी बाबत त्यांनी माहिती दिली.  सेंद्रीय पदार्थांचा कमी वापर, सेंद्रिय कर्बाचे कमी प्रमाण, पिकांची फेरपालट नसणे, खतांचा असुंतिल वापर, पाण्याचा अशास्त्रीय वापर, जमिनीची जलधारण क्षमता कमी असणे, चुनखडीत प्रमाण १० टक्के जास्त असणे आदी कारणांमुळे जमिनी नाफिक बनत असून उपाययोजना करण्याची गरज डॉ. प्रमोद जगताप यांनी व्यक्त केली. 
कृषी प्रदर्शनात ४१ स्टॉलधारकांनी उपस्थिती लावत शेतकऱ्यांना विविध प्रकारची माहिती दिली. यामध्ये शेती अवजारे, ठिबक, सेंद्रिय व रासायनिक खते, कृषी औजारे, विविध कंपनीचे ट्रॅक्टर, रोपवाटिका, नर्सरी, फर्टिलायझर याबाबत माहिती देण्यात आली. बारामती व ग्रामीण भागातील व्यावसायिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सासवड, नाशिक, पुणे, निरा, सोलापूर, रहिमतपूर, फलटण, जेजुरी आदी भागातील स्टॉल धारक सहभागी झाले होते. 
       दुसऱ्या सत्रात उन्हाळी हंगाम ऊसपिक व्यवस्थापन व आडसाली ऊस व्यवस्थापन या विषयावर व्हीएसआय चे निवृत्त शास्त्रज्ञ सुरेश माने यांनी मार्गदर्शन केले. 
ऊस पिक परीसंवाद व कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांनी माहिती घेत ऊसाचे जास्तीतजास्त उत्पादन घेण्याचे आवाहन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी यावेळी केले. 
To Top