सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : प्रतिनिधी
सामूहिक विवाह सोहळ्यांतून जनमानसात सामाजिक एकात्मतेचा संदेश रुजला जातो. त्यामुळे हे विवाह सोहळे ही समाजाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील केतकेश्वर सांस्कृतिक भवनात सोमवारी (दि.१५) इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व इंदापूर तालुका मुस्लिम युवक संघटनेच्या वतीने मुस्लिम बांधवांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री पाटील बोलत होते. यावेळी सामुदायिक १० जोडप्यांचा मोफत विवाह संपन्न झाला.
यावेळी पुढे बोलताना पाटील म्हणाले की, सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. विवाहावर नाहक होणारा अमाप खर्च सामुदायिक विवाह सोहळ्यांतून टाळता येऊ शकतो. हाच पैसा संसारासाठी वापरावा, असे आवाहन करत सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची खरी गरज बनली असल्यामुळे असे सामुदायिक विवाह सोहळे प्रत्येक ठिकाणी आयोजित करण्यात यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व इंदापूर तालुका मुस्लिम युवक संघटनेचे सामुदायिक विवाह सोहळ्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढत पाटील यांनी विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.