सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
लोणंद : प्रतिनिधी
पाडेगाव ता. खंडाळा येथील वृद्धेचा वीर धरणाच्या निरा उजव्या कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दि. १५ रोजी घडली.
पाडेगाव ता.फलटण येथून वाहणाऱ्या निरा उजव्या कालव्यात एक स्त्री जातीचे प्रेत पाण्यातून वाहताना पाडेगाव येथील स्थानिकांकडून लोणंद पोलीसांना समजताच लोणंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांनी सहकाऱ्यांसह ताबडतोब उजव्या कालव्याच्या दोन्ही किनाऱ्यावरून तपास करत तुकाईनगर पाडेगाव येथील लोखंडी पुलाजवळ वाहत आलेले प्रेत बाहेर काढून त्याची ओळख पटविण्यासाठी पोलीस यंत्रणा राबवून कालव्या लगतच्या सर्व गावात शोध घेऊन मयताच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत सदर महिला हि पिंपरे ता खंडाळा येथील धायगुडे मळा येथील सिताबाई नामदेव धायगुडे वय 72 , असल्याचे निष्पन्न केले. सदर वृद्ध महिला हि नवरा तसेच मुलं नसल्याने सध्या तिचे माहेरी बारामती तालुक्यातील पनदरे येथे रहावयास असायची. पिंपरे येथे भावकीतील लग्न असल्याने ती चारच दिवसापुर्वी पिंपरे धायगुडेमळा येथे आलेली होती. आज सकाळीच घरातील सर्वजण नातेपुते येथे एका वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमास गेले असताना ही दुर्घटना घडली असल्याचे समजते.
या प्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून सपोनि विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.