सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाचा पारा वाढल्याने चांगलेच चटके बसू असताना मध्यंतरीच्या काळात दोन ते तीन वेळा अवकाळी पाऊस बरसला आहे.यामुळे शेतकऱ्यांनी रिकाम्या झालेल्या शेतात उन्हाळी मशागतीच्या कामांना सुरूवात केली असून ट्रॅक्टरच्या मदतीने नांगरणी व अन्य कामांची लगबग सुरू असल्याचे चित्र तालुक्याच्या ग्रामीण भागात आहे.
ग्रामीण भागात रब्बीत गहू, हरभरा पिकांची काढणी झाल्यानंतर शेत रिकामे होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी रिकाम्या झालेल्या शेतात मशागतीच्या कामाला लागला असून ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करत मशागतीची कामे शिवारात सुरू आहेत.दुपारी सूर्य आग ओकत असल्याने शेतकऱ्यांना दुपारच्या दरम्यान काम करणे मुश्किल होत आहे.यामुळे शेती कामांचे वेळापत्रक बदलून सकाळी ,सायंकाळी शेतकरी शेती कामे करीत असताना दिसत आहेत.त्यातच डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या शेतीकामाच्या रोजंदारीत वाढ झाली आहे.
----------
शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा
रब्बीतील पिकांची कापणी होऊन पुढील हंगामासाठी शेती कामे शेवटच्या टप्प्यात उरकत आली असून तालुक्यात प्रामुख्याने खरिपात घेतल्या जाणाऱ्या भात पिकासाठी भात तर्वे टाकण्यासाठी तसेच भात पेरणी करण्यासाठी पावसाची प्रतीक्षा लागून राहिल्याचे चित्र आहे.