खंडाळा ब्रेकिंग ! लोणंदच्या अंकुर हाँस्पिटलची सोनोग्राफी यंत्रणा आरोग्य विभागाकडून सील : पुरंदर तालुक्यातील गर्भलिंग चाचणीचे लोणंद कनेक्शन?

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील अवैध गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात प्रकरणात निरा येथील श्रीराम हॉस्पिटल मधील डॉ. सचिन रणवरे याच्यावर पुणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ एमपल्ले यांनी रविवार दि.१४ रोजी कारवाई करत जेजुरी पोलिसांत फिर्याद दाखल केलीय, या प्रकरणाचे आता लोणंद कनेक्शनही उघड झाले आहे.

पुरंदर तालुक्यातील निरा शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका महिलेचे दुसर्‍यांदा गर्भलिंग निदान करण्यात आले. त्यात स्त्रीलिंगी गर्भ असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर निरा येथील श्रीराम हॉस्पिटलमध्ये डॉ. सचिन रणवरे याने गुपचूप गर्भपात केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जेजुरी पोलिस ठाण्यात डॉ. रणवरे, गर्भपात करणारी महिला आणि बरकडे नावाचा एजंट अशा तिघांविरुद्ध पुणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ एमपल्ले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात अधिक तपास करीत असताना या प्रकरणाचे धागेदोरे लोणंद येथील डॉक्टर अमर शिंदे यांच्या अंकुर हॉस्पिटल पर्यंत येऊन पोहचले आहेत.

या प्रकरणातील आरोपी महिलेस याआधी एक मुलगी आहे. आता दुसऱ्यांदा राहिलेला गर्भ मुलाचा की मुलीचा हे पाहण्यासाठी घरच्यांनी त्या महिलेची सोनोग्राफी लोणंद येथील अंकुर हॉस्पिटल येथील केंद्रावर ३ एप्रिल रोजी केली होती. गर्भवती मुलीचा १४ मे रोजी निरा येथील श्रीराम हॉस्पिटलमध्ये गर्भपात करण्यात आला. यानंतर पुणे जिल्हा आरोग्य पथकाने लोणंद येथील आरोग्य यंत्रणेला कळवून गर्भलिंग निदान करणाऱ्या या सोनोग्राफी सेंटरवर छापा टाकत सदर सेंटर सील केले आहे.
To Top