सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : प्रतिनिधी
मेढा - महाराष्ट्र शासनाचा स्मार्ट गाव म्हणून नावलौकिक मिळवलेल्या चोरांबे गावातील महिला ,युवक व ग्रामस्थांचा गावातील विकासात आणि श्रमदानात असलेला सहभाग,एकी पाहता व आता स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र व सरपंच परिषद यांनी चोरांबे गाव दत्तक घेऊन सेंद्रिय शेती, बालसंस्कार, स्वयंरोजगार, विवाहसंस्कार,औषधी वनस्पती लागवड,निरोगी नागरिक आदी बाबतीत गावात जनजागृती आणि मार्गदर्शन करण्यात येणार असून त्यानंतर चोरांबे गाव राज्यात नव्हे तर देशपातळीवर झळकेल व गाव पाहण्यासाठी इतर गावातील ग्रामस्थ चोरांब्याला भेट देतील असे प्रतिपादन दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्राचे गुरुपुत्र कृषिरत्न आबासाहेब मोरे यांनी व्यक्त केले
जागतिक कृषी महोत्सव-सरपंच मांदियाळी अंतर्गत दिंडोरी येथील स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र व सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राज्यात स्वावलंबी दत्तक गाव उपक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी चोरांबे गावाची निवड करण्यात आली आहे या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी कृषिरत्न मोरे बोलत होते यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताजी काकडे,प्रदेश सरचिटणीस ऍड विकास जाधव,जिल्हाध्यक्ष आनंदराव जाधव,अजिंक्यतारा कारखान्याचे व्हा-चेअरमन नामदेव सावंत, बाजार समितीचे संचालक अरुण कापसे,व्यसनमुक्तीचे विलासबाबा जवळ,समाधान पोफळे,सरपंच विजय सपकाळ, निवृत्त पोलीस उपअधीक्षक एम जी सपकाळ,पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शशिकांत गुरव आदी मान्यवर उपस्थित होते
कृषिरत्न मोरे म्हणाले आम्ही गाव दत्तक घेतोय म्हणजे फंड वगैरे देणार नाही मात्र प्रत्येक बाबतीत गाव स्वावलंबी बनवण्यासाठी मार्गदर्शन आणि साहित्य पुरवणार आहोत गावाला लागणाऱ्या गरजा गावातच पूर्ण कशा करता येतील,गावात सुजाण नागरिक कसा निर्माण होईल,लहान मुलांच्यावर संस्कार, विषमुक्त शेती कशी करायची,गावातच रोजगार कसा उपलब्ध करायचा,आपले सण,उत्सवांच अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व काय आहे,महिलांचे आरोग्य,पाण्याचा पुनर्वापर कसा करायचा यासाठी आम्ही काम करणार आहोत स्वयंरोजगार, बालसंस्कार, विवाहसंस्कार, सेंद्रीय शेती, आयुर्वेदिक वनस्पती लागवड,पर्यावरण, प्रदूषण मुक्त गाव,जल संवर्धन, व्यसनमुक्ती आणि निरोगी गाव होण्यासाठी आम्ही ही दत्तक गाव उपक्रम राबवत आहोत
माजी आमदार सदाशिव सपकाळ म्हणाले आमच्या चोरांबे गावातील एकी हेच आमचे बळ आहे सर्वजण एकजुटीने गावाच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होतात आम्ही जास्त प्रसिद्धीच्या मागे लागत नाही काम करत राहणे एवढंच तत्व पाळतो आता स्वावलंबी दत्तक उपक्रमातही आम्ही यशस्वी होऊ सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताजी काकडे म्हणाले आम्ही या स्वावलंबी गाव उपक्रमात राज्यात पंच्याहत्तर गावे दत्तक घेणार आहोत त्याचा शुभारंभ आज चोरांबे गावातून होत आहे चोरांबे गावाचे मूल्यांकन करून आम्ही निवड केली खेडी सुधारली पाहिजेत ती स्वावलंबी झाली पाहिजेत लाखो रुपये खर्चून गावोगावी पारायणे सप्ताह होतात मात्र त्यातून बोध काहीच घेतला जात नाही अशी खंत व्यक्त करून ढाबा संस्कृतीने युवा पिढी बाद होत असल्याचे काकडे म्हणाले
प्रास्ताविक सरपंच विजय सपकाळ यांनी केले कार्यक्रमाला स्वामी समर्थ सेवेकरी,परिसरातील गावोगावचे सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते