सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : प्रतिनिधी
जावली तालुक्यातील वालुथ येथिल हनुमंत बाबुराव चव्हाण यांच्या घराला अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असून यामध्ये संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे तर साधारण १२ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. चव्हाण कुटुंबीयांचा संसार उघड्यावर पडला आहे.
वालुथ, ता. जावळी येथे आज सकाळी अकराच्या सुमारास विजेचा प्रवाह सुरू झाल्याने अचानक आलेल्या विजेमुळे विद्युत भार वाढला असावा. त्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्याने आगीने पेट घेतला. घर जुने असल्याने संपूर्ण घराला आग लागली या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले आहे तर घरातील संसार उपयोगी साहित्य सर्व आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. लागलेल्या आगीची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. मात्र जावळी तालुक्यात अग्निशमन दल नसल्याने वाई, पाचगणी, महाबळेश्वर, अग्निशमन दलाची गाडी पाचारण केली जाते. येथेही महाबळेश्वर येथील अग्नीशमनदलाची गाडी आली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
यावेळी पाचवड येथील द्रोणाचार्य अकेडमी विद्यार्थ्यांनी जीवाची पर्वा न करता आग विझविण्या करीता प्रयत्न केले. तर सिलेंडर ची टाकी तात्काळ काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थ, व युवक तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी सुद्धा प्रयत्न केले. आग लागलेल्या घटना स्थळी तलाठी सागर माळेकर, व ग्रामसेवक सुधीर रांजणे, यांनी भेट दिली घटनेचा पंचनामा केला यामध्ये प्राथमिक दृष्ट्या १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे.
--------------------
जावळी तालुक्यातील आपत्कालीन घटना घडल्यास अग्नीशमन दल उपलब्ध नसल्याने वाई पाचगणी महाबळेश्वर येथून अग्नीशमन दलाची गाडी येईपर्यंत मोठे नुकसान होत असते. याकरिता तालुक्यात अग्नीशमन दलाची नितांत आवश्यकता आहे.
------------------
चव्हाण कुटुंबीय यांचा संसार गाडा पुन्हा उभा राहण्याकरिता त्यांना तात्काळ मदत मिळणे आवश्यक आहे. समाजातील दानशूर तसेच पंचक्रोशीतील व्यक्तींनी पुढे सढळ हाताने मदत करावी. असे आवाहन शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख जिल्हाध्यक्ष सातारा, कमलाकर भोसले यांनी केले आहे.