सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
नीरा परिसरात शनिवारी दुपारी अचानक आलेल्या वादळ वाऱ्यामुळे आळंदी पंढरपूर महामार्गालगत असलेले भले मोठे अनाधिकृत होर्डिंग कोसळले. सुदैवाने हे होर्डिंग वाहतूकीच्या रस्त्यावर न पडता झाडावर व लाईटच्या खांबावर पडल्याने कोणतीही हानी झाली नाही. पण लाईटच्या पोलचे व तारांचे मात्र नुकसान केले, यामुळे विद्युतपुरवठा मात्र खंडित झाला होता.
हे होर्डिंग कोणतीही परवानगी न घेता उभारण्यात आलेले असून या अनधिकृत होर्डिंगमुळे एखादा जीव मूकण्याची वेळ येऊ शकली असती. या होर्डिंग शेजारी असलेल्या बाभळीच्या झाडाखाली सर्वोदय सोसायटीचे काही लोक सावलीला बसलेले असतात. हे होर्डिंग जमीनीवर न पडता लगत असलेल्या महावितरणच्या विद्युत तारेवर व बाभळीच्या झाडावर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. विद्युत पुरवठा करणारे दोन यामुळे वाकले व विद्युत पुरवठा खंडित झाला.
हे पडलेले मोठे होर्डिंग पाहण्यासाठी मात्र नीरेतील नागरिकांना गर्दी केली. होर्डिंग पालखी महामार्गावर पडले असते तर मोठा अनर्थ घडला असता. रस्त्यावरून ये जा करत असलेल्या गाडीच्या दिशेने पडले असते किंवा नागरिकांच्या अंगावर पडले असते तर भली मोठी दुर्घटना होऊ शकली असती. अशी संतप्त प्रतिक्रिया सुद्धा नीरा ग्रामस्थांकडून व्यक्त होऊ लागली आहे.
लोकवस्तीत अशा प्रकारचे भले मोठे होर्डिंग लावणे हे किती धोकादायक असू शकते. याची प्रचिती नीरेकरांना आज आली. नीरा शहरात अशा प्रकारे भले मोठे होर्डिंग लावण्याची गरज नसून यावर आता प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. असे मत आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल साबळे यांनी व्यक्त केले.
---------
या होर्डिंग बाबत अधिक माहिती जाणून घेतली असता असे समजले की हे लोखंडी होर्डिंग उभारण्यासाठी कोणतीही परवानगी ग्रामपंचायती कडून देण्यात आलेली नाही. ग्रामपंचायती कडून हे होर्डिंग उभारण्याची परवानगी न घेता अशा प्रकारे हे नियमबाह्य होर्डिंग उभे असताना प्रशासनाने यावर का लक्ष दिले नाही. याकडे का कानाडोळा केला. याबाबतीत ही विचारणा होऊ लागली आहे.