खंडाळा ! हैबतबाबांच्या भूमीत पोलीस मानवंदना देवून माऊलींचे दिमाखदार स्वागत...! पुणे जिल्ह्यातील आपला प्रवास संपवून सातारा जिल्ह्यात वैष्णवांचा मेळा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद, : प्रतिनिधी
हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदुंगांच्या गजरात आज दुपारी दिड वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने निरा नदीकाठी पुणे जिल्ह्यातील आपला प्रवास संपवून निरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून मार्गक्रमण करत टाळ मृदुंगाच्या साथीत मोठ्या आनंदाने भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. 

पालखी सोहळयाचे प्रवर्तक हैबतबाबांची भूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर निरा नदीवरील माऊली भक्तांनी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि माऊली माऊली च्या जयघोषात जलतुषार आणि फुलांच्या वर्षावात प्रसिद्ध दत्तघाट या ठिकाणी माऊलींच्या पादूकांना निरा स्नान घालण्यात आले. यावेळी सातारा पोलीस दल तसेच खंडाळा रेस्क्यू टीम यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सातारा जिल्ह्याच्या वतीने नीरा नदीच्या काठी पाडेगाव दत्त घाट येथे माऊलींचे निरा स्नान संपन्न झाल्यानंतर पाडेगाव जुना टोलनाका येथे जिल्हा परिषद सातारा व खंडाळा तालुक्याच्या वतीने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी महाराज सोहळ्याचे साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांत राजेंद्र जाधव, तहसीलदार अजित पाटील, तालुका आरोग्य अधिकारी अविनाश पाटील,  बिडीओ वाघमारे, लोणंदचे उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके , लोणंद बाजार समिती अध्यक्ष सुनिल शेळके , हर्षवर्धन शेळके , विश्वास शिरतोडे सर्फराज बागवान, तारिक बागवान, ओंकार कर्नवर, हेमंत निंबाळकर,  शंभूराजे भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करुन स्वागत केले.

यावेळेस सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी तसेच हजारो भाविकांनी दर्शन घेतले. माऊलीच्या  दर्शनासाठी भाविकांनी  एकच गर्दी उसळली होती.  हरिनामाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात पालखी सोहळ्यात भाविक तल्लीन झाले होते. यानंतर पालखी सोहळा लाखो वारकऱ्यांसह आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाकडे लोणंदच्या दिशेने मार्गस्थ झाला.
To Top