सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निसगार्ची अवकृपा अन लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे बारामतीच्या जिरायती भागातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. बारामती पुरंदर तालुक्यातील जिरायत भागातील शेती सिंचनासाठी जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजना करण्यात आल्या. त्यासाठी २५ वर्षात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले . परंतु नेतृत्वाच्या स्वार्थी भूमिकेने या योजनांचे पाणी अपवाद वगळता मिळणे स्वप्नच राहिल्याचा आरोप भाजप नेते दिलीप खैरे यांनी केला आहे.
खैरे म्हणाले, बारामती पुरंदर तालुक्यातील जिरायत भागातील शेती सिंचनासाठी जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजना करण्यात आल्या. त्यासाठी २५ वर्षात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले .परंतु या योजनांचे पाणी अपवाद वगळता मिळणे स्वप्नच राहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात उपसा सिंचन योजना साठी आवर्तन काळात २४ तास अखंड वीज पुरवठा आणि पाणी पट्टी १९ टक्के आकारणीचा निर्णय झाला. त्याची अमलबजावणी सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, असे वाटत असतानाच सरकार बदलले. त्यानंतर ठाकरे - पवार यांच्या सरकारने वीज दर वाढवले. परीणामी पाण्याचे दर पुन्हा शेतकऱ्यांच्या आवाक्या बाहेर गेल्याने मागील वर्षी पाणी मिळाले नाही. परिसरातील पिके देखील जळाली होती.
दरम्यान पुन्हा एकदा सरकार बदला नंतर माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे प्रयत्नातून वीज दर कमी करण्यात आले. त्यामुळे शेतकर्याच्या अपेक्षा वाढल्या बारामतीचे लोकप्रतिनिधींनी अजित पवार यांनी नेहमी प्रमाणे राजकीय सोयीसाठी पाणी या विषयात आपल्या मतदार संघातील शेतकर्याना वार्यावर सोडले. त्यामुळे या भागातील जवळपास दोन लाख टना पेक्षा अधिक ऊस पाण्यावाचून जळताना शेतकर्याना हतबल होऊन पहावे लागत आहे. तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकार्यानी योग्य नियोजन केले नसल्याने शेतकर्यावर हि नामुष्कीची वेळ आली.
दौंड, इंदापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी आपल्या भागातील शेतीचे पाण्यासाठी प्रचंड आग्रही भूमिका घेतात. तसेच तालुक्यातील शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी मिळवून देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तर बारामतीचे लोकप्रतिनिधी अजित पवार मात्र पुणे शहर व बाजूच्या भागातील हित संबंध दुखावले जाऊ नयेत, म्हणून बारामतीच्या जिरायती भागाच्या वाट्याचे पाणी इतरत्र वळविले जात असताना गप्प बसतात. इतकेच काय तर मागील सरकार मध्ये प्रमुख असतानाही या योजनांचे पाणी दर वाढवून आपल्या मतदार संघातील प्रामाणिक मतदार शेतकर्याशी द्रोह केला. त्यांना जिरायती भागात यापुढे फिरताना शेतकरी विरोधाचा सामना करावा लागणार असून याचा जाब अजित पवार यांनी द्यावा अशी मागणी खैरे यांनी केली आहे.