सोमेश्वर रिपोर्टर टीम---
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद नगरीत काल भक्तीपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विसावला. लोणंद येथे सातारा ,कराड, भोर ,महाड ,कोकण या ठिकाणाहून भाविक माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात. काल संध्याकाळपासूनच दर्शनासाठी स्त्री व पुरुषांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. रात्रभर ठिकठिकाणी चाललेल्या भजन किर्तनात लोणंदकर दंग होऊन गेलेत. अवघे लोणंद भक्तिमय वातावरणात लिन झालेले आहे.
यावर्षी पाऊसकाळ लांबल्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या वारीच्या या आनंद सोहळ्यामुळे "आनंदाचे डोही आनंद तरंग " या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे लोणंदकरांच्या मनात आनंदाचे तरंग उठत आहेत. अनेकजण आपापल्या परीने जमेल तशी वारकऱ्यांची सेवा करण्यात मग्न आहे. कोणी वारकऱ्यांच्या पायाला तेल लावून मसाज करून देतेय तर कोणी अंग चेपून देतेय , अनेकजण स्वतःहून वारकऱ्यांना चहा आणि फराळ देऊ करताहेत. वारकऱ्यांच्या सेवेत कुठलीच कमतरता राहणार नाही याची काळजी सर्वच लोणंदकर घेताना दिसत आहेत.
आजच्या मुक्कामानंतर माऊलींची पालखी उद्या दूपारी विठ्ठलाच्या ओढीने पंढरीच्या दिशेने तरडगाव कडे मार्गस्थ होईल. उद्या दि. २० रोजी तरडगावात पोहोचण्यापूर्वी ऐतिहासिक "चांदोबाचा लिंब" या ठिकाणी दुपारी २ वाजता माऊलींच्या पालखीचे पहिले "उभे रिगंण" पार पडणार आहे. याठिकाणी रिगंण सोहळा पाहण्यासाठी लांबून भाविक येतात. याच ठिकाणी रिगंण सोहळ्यानंतर वारकरी फुगडी सारख्या खेळांचा आनंद लुटतात तर काही टाळ मृदंगाच्या ठेक्यावर ताल धरून नृत्याचा आनंद घेतात. त्यानंतर सायंकाळच्या मुक्कामासाठी पालखी तरडगावच्या दिशेने मार्गस्थ होईल