पुरंदर ! शिवतारेंचा पाणी मुद्द्याला हात... मांडकी डोह फुल्ल...मा. राज्यमंत्र्यांनी राजकीय वजन वापरून वीर धरणातून पाणी सोडण्यास भाग पाडले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
पाऊस लांबल्याने व धरणातून विसर्ग न झाल्याने नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना धास्ती लागली आहे.   पुरंदरचा बागायती भाग म्हणून ओळख असलेल्या जेऊर, मांडकी या नीरा नदिच्या काठावरील शेतकरी अडचणीत आला होता. मांडकी डोहावर जेजुरी सह इतर गावांच्या पाणीपुरवठा अवलंबून असतो. या डोहात पाणी सोडण्याचा मुद्दा ऐरणीवर असताना माजी राज्यमंत्र्यांनी या मुद्द्याला हात घातला, अधिकाऱ्यांना फोनवरुन झाडाझडती घेत, आपले राजकीय वजन वापरून वीर धरणातून मांडकी डोह फुल करुन घेतला. 

        मांडकी, जेऊर येथील पाणी टंचाईबाबत येथील सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थांनी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची भेट घेतली. परिसरात झालेल्या पाणी टंचाईमुळे ऊस बागायत पाण्याविना अडचणीत आलेच पण पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई निर्माण झाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शिवतारे यांनी याबाबत पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांना संपर्क साधून या गावांसाठी नीरा नदीतून तलावात पाणी सोडण्याच्या सूचना केल्या. डाव्या व उजव्या कालव्याद्वारे बारामती व इतर तालुक्यांना वितरण सुरू असल्याने तूर्तास असमर्थ असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगताच शिवतारे यांनी आपला खाक्या दाखवत पाणी सोडण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडले आणि अवघ्या काही तासात मांडकी तलावात नीरा नदीतून पानी पोचले. 

       कार्यकारी अभियंता श्री. धोडपकर यांना शिवतारे म्हणाले, गुंजवणी नदीत पुरंदर आणि भोर वेल्हा तालुक्याच्या हक्काचे असलेले पाणीच पुढे तुम्ही बारामती व इतर तालुक्यांना विर धरणातून देत आहात. त्या पाण्यावर या तीन तालुक्यांचा प्रथम हक्क आहे. इकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना तिकडे उसाला पाणी सोडण्याचा संबंध नाही. ताबडतोब पुरंदरला जिथे जिथे पाण्याची आवश्यकता आहे तिथे तिथे तुम्हाला पाणी सोडावे लागेल. यावर जलसंपदा विभागाचे अधिकारी वरमले आणि त्यांनी तत्काळ नीरा नदीतून या गावांना पाणी सोडल्याची माहिती राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे स्विसहायक माणिक निंबाळकर यांनी दिली. 

     त्यामुळे खुश झालेल्या ग्रामस्थ मंडळींनी आणि शेतकऱ्यांनी आज शिवतारे यांच्या हस्ते तलावातील पाण्याचे जलपूजन केले. या पाण्याचा लाभ जेऊर, मांडकी, हरणी, लपतळवाडी, पिसूर्टी, पिंपरे, सुकलवाडी इत्यादी नदी काठवरच्या सर्व गावांना झाला आहे.  यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, प्रवीण जगताप, विजय साळुंके, दशरथ शिंदे, युवराज जगताप, अंकुश जगताप, नरसिंग जगताप, राजेंद्र जगताप, अशोक शिंदे, सुरेश जगताप,  विठ्ठल शिंदे, स्वप्नील थोपटे, धनंजय यादव, दत्ता धुमाळ, माऊली धुमाळ, प्रकाश धुमाळ यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
To Top