सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर - हेमंत गडकरी
मी कॉलेजला, अकॅडमीला जायचे तेव्हा आमच्या समाजातील लोक वडिलांना हिनवयाचे. आपल्या समाजातील मुलींना इतकं शिकवायचं असत का? तीच लग्न लावून टाक असे म्हणायचे पण माझ्या वडिलांनी मला पाठबळ दिले आणि त्यामुळेच मी खाकी वर्दी अंगावर चढवू शकले असे उद्गार वडार समाजातील पोलीस भरती झालेल्या पूजा पवार हिचे आहेत.
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील वडार समाजातील तरुणी पूजा सोनाजी पवार हिची नुकतीच मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. पूजा हिचे वडील सोनाजी पवार पंचवीस वर्षांपूर्वी बीड येथून रोजगाराच्या शोधात कोऱ्हाळे बुद्रुक येथे आले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांनी त्यांना गावात आधार दिला. घरकुलाची जागा व घरकुल मिळवून दिले. सोनाजी पवार आपली पत्नी फुलाबाई यांच्या मदतीने पाईपलाईन साठी चर खांदण्याचे काम करतात. मात्र त्यांनी आपल्या सर्व मुलांना चांगले शिक्षण दिले. मुंबई पोलीस दलात भरती झालेल्या पूजाचे शालेय शिक्षण गावातील सिद्धेश्वर हायस्कूल या ठिकाणी झाले. बारावीनंतर तिने शारदाबाई पवार महाविद्यालयातील पोलीस भरती अकॅडमी प्रवेश घेतला. तेथील मुख्य विश्वस्त सुनंदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा हिने कसून सराव केला व पहिल्याच प्रयत्नात मुंबई पोलीस दलात ती भरती झाली.
वडार समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असताना व बालविवाहाची प्रथा असताना पूजा हिने या दोन्ही प्रथांना छेद दिला व आपल्या आई-वडिलांचे कष्ट सार्थकी लावले. पूजा हिच्या यशाचे गावकरी कौतुक करत असून नुकताच खासदार सुप्रिया सुळे यांनीही पूजाचा सत्कार केला.
वडार समाजातील मुलींनी शिक्षणाची कास धरावी. पालकांनी ही मुलींना शिकू द्यावे. त्यांचा बालविवाह करू नये. माझ्या यशाने प्रेरणा घेऊन माझ्या समाजातील आणखी मुलींनी पोलीस दलात भरती व्हावे अशी इच्छा पूजा सोनाजी पवार हिने व्यक्त केली.
.........