सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोरटेवाडी (ता. बारामती) येथील केंजळे परिवाराच्या चौथ्या पिढीने संत सोपानकाका पालखी सोहळ्यासाठी स्वः मालकीची बैलजोडी पाठविण्याची परंपरा जपली आहे. मंगळवार (दि. १३) रोजी विधिवत पूजा करून राजा आणि सोन्या ही बैलजोडी सासवडकडे पाठविण्यात आली.
संत सोपानकाका पालखीचा रथ ओढण्याचा मान सुमारे १२५ वर्षांपासून या परिवाराला मिळत आहे. केंजळेवाड्यात पूजन करून बैलजोडी सासवडकडे पाठवण्यात आली. पंढरपूर एकादशीला पादुकांना स्नान घालणे आणि पालखी सोरटेवाडीत आल्यानंतर महाअभिषेक करणे याचाही मान केंजळे परिवाराला आहे. बैलजोडी प्रसंगी केंजळे परिवारातील नितीन कुलकर्णी, विकास केंजळे, अरुंधती केंजळे, रागिणी कुलकर्णी, ऋचा केंजळे, ज्ञानेश्वर केंजळे, गंगाराम कामठे, विजय राजवडे तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैलजोडीचे पूजन करण्यात आले.
संत सोपानकाका पालखी सोहळा गुरूवार (दि. १५)रोजी सासवडवरून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखी रथासाठी एक आणि नगारा वाहून नेण्यासाठी येथील कुलकर्णी आणि केंजळे परीवाराने निपाणी येथून राजा आणि सोन्या ही दोन बैलजोडी खरेदी केली आहे. सुमारे १२५ वर्षांपूर्वी सोपानकाका पालखी सोहळा आकारास आला. सुरुवातीला भोई समाजातील लोक पालखी वाहून नेत असत. काही वर्षांनी बैलांच्या साहाय्याने पालखी ओढून नेता येईल असा रथ तयार करण्यात आला. सोरटेवाडी येथील कै. बापूसाहेब बाळाजी केंजळे सोपानकाकांच्या समाधीचे सेवेकरी होते. त्यांच्याकडे सुरुवातीला हा मान होता. त्यानंतर त्यांच्या चौथ्या पिढीने ही परंपरा सुरू ठेवली आहे.