सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीची साथ सोडून बंड करीत सत्ताधारी भाजप-शिवसेनेसोबत जात उपमुख्यमंत्री झाले.
या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत असून साहेब की दादा आम्ही कोणाचा झेंडा घेऊ हाती अशा संभ्रमावस्थेत आहेत.
भोर तालुक्यात एकीकडे अनेकांकडून अजित पवार यांच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना अजित पवार काही आमदारांसह का सोडून गेले, त्यांचा हा निर्णय चुकीचा आहे असा बहुतांशी कार्यकर्त्यांमध्ये प्रश्न उपस्थित झाला असून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.त्यातच सोमवार दि.३ शरद पवार हे पुणे-सातारा महामार्गावरून कराडकडे जात असताना भोर तालुक्यातील बहुतांशी पुढारी व कार्यकर्ते यांनी कापूरव्होळ येथे पवार यांची भेट घेवून स्वागत केले.दरम्यान या भेटीमुळे भोर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पुढारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ देणार का? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबरोबर राहणार अशा चर्चेला तालुक्यात उधाण आले आहे.