बारामती ! ११२ नंबरवर मदत मागा.....काही मिनिटातच पोलिस तुमच्या मदतीला पोचतील याची खात्री : गणेश इंगळे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती ही एज्युकेशन हब होते आहे, साऱ्या राज्यातील पालकांना आपला मुलगा, मुलगी बारामतीत शिकावा असे वाटते आहे. हे वातावरण असेच वाढावे, याला कसलेही गालबोट लागू नये यासाठी पोलिस तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे. कोणतीही मदत हवी असेल तर ११२ या क्रमांकावर फोन करा. काही मिनिटातच पोलिस तुमच्या मदतीला पोचतील याची मी खात्री देतो,अशी ग्वाही बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली. ते बारामतीतील कोचींग क्लासेस चालकांच्या बैठकीत बोलत होते. बारामती तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडेही यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 

बारामतीत शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या सतत वाढते आहे. मात्र याबरोबर आपली जबाबदारी वाढली आहे. कोणतीही चुकीची घटना या सगळ्यावर पाणी फिरवू शकते, यासाठी सर्व कोचींग क्लासेस चालकांनी सदैव सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

पोलिस खात्याकडून यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आलेले आहे. ते लॉज, हॉटेलची तपासणी करतात, शैक्षणिक संस्था, त्यांची हॉस्टेल येथे लक्ष ठेवतात. मध्यंतरी पोलिसांकडून शहरातील कॅफेंची तपासणी केली गेली. आतमध्ये कोण बसले आहे, हे बाहेरून दिसावे अशाप्रकारची व्यवस्था या कॅफेचालकांना पोलिसांनी करायला लावली आहे. मात्र कोचिंग क्लासेस चालकांची जी जबाबदारी आहे, ती त्यांनी पार  पाडणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये आपल्याकडे असणाऱ्या सुरक्षारक्षकांची सर्व माहिती पोलिसांना द्यावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे ड्रायव्हर, होस्टेलवर असणारे कर्मचारी यांची निवड काळजीपूर्वक करावी. याबाबतही गरज पडल्यास पोलिसांची मदत घ्यावी. संस्थेच्या परिसरात सीसीटिव्ही लावावेत, याचा डेटा वेळोवेळी चेक करावा. किमान ७ दिवसांचा डेटा उपलब्ध असला पाहिजे. आपल्या संस्थेत दहापेक्षा जास्त महिला कर्मचारी काम करत असल्यास संस्थेअंतर्गत लैंगिक छळाबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठीची समिती नेमणे कायद्याने बंधनकारक आहे. पॉस्को अॅक्टनूसार १८ वर्षापेक्षा कमी वयाचा मुलगा किंवा मुलीचा लैंगिक छळ झाला आणि त्याची माहिती जर दिली गेली नाही तर माहिती दडपणाऱ्यावरही अजामिनपात्र गुन्हा दाखल होतो, यामुळे याबाबतही काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले. 

९५ टक्क्यांहून जास्त विद्यार्थी आपले शिक्षण जास्तीत जास्त चांगले व्हावे यासाठी प्रयत्न करत असतात, पण पाच सात टक्के विद्यार्थी मात्र चुकीचे वागताना दिसतात. त्यांच्या पुढील आयुष्याचा विचार करून पोलिस नरमाईची भुमिका घेतात, यामुळे काही विद्यार्थी योग्य मार्गावर येतात, पण काहींना यातच फुशारकी वाटते. ते गुन्हेगारीच्या मार्गावर पुढे चालू लागतात, असे विद्यार्थी संपूर्ण शैक्षणिक वातावरण बिघडवू शकतात. त्यामुळे याबाबत क्वासचालकांनी सदैव सावध राहण्याची गरज असल्याचे बारामती तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी यावेळी सांगितले. ११२ नंबरवर आलेल्या प्रत्येक फोनबाबत संबंधित पोलिस पथकाला अहवाल सादर करावा लागतो. बारामतीमध्ये निर्भया पथकात ८ ते १० कर्मचारी आहेत. फोन आल्यानंतर १० ते १५ मिनिटात ते जागेवर पोचतात. परंतू अजूनही या यंत्रणेचा नागरिक पुरेसा वापर करत नसल्याचेही श्री. मोरे यांनी सांगितले. 

कोचींग क्लासेससाठी घरपट्टीची आकारणी ही व्यावसायिक म्हणून होते. आपल्या क्लासच्या जागेची याप्रमाणे आकारणी होते आहे, याची आपण खात्री करून घ्यावी, आपल्या जागेतील वीजजोडण्या सुरक्षित आहे याची हे नियमितपणे पहावे, प्रत्येकाने अग्नीशमन दलाचा ना हरकत दाखला घेणे गरजेचे असल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी यावेळी सांगितले. 
         विद्यार्थ्यांचे समुपदेशन जर पोलिसांनी केले तर त्याचा जास्त चांगला फायदा होईल, यासाठी आवश्यक असेल ते सहकार्य क्लासेस चालक करतील असे यावेळी प्रा.गौरव गुंदेचा यांनी सांगितले. पोलिस आणि नगरपालिका प्रशासनाने आपल्यापर्यंत येऊन ही माहिती दिली. आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावे. बारामतीतील शैक्षणिक वातावरण चांगले असावे यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी प्रा. शेषराव काळे केले.
To Top