सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली प्रतिनिधी: धनंजय गोरे
"देणाऱ्याने देत जावे ,घेणाऱ्याने घेत जावे ,घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे दोन्ही हात घ्यावे." या कवी विंदा करंदीकरांच्या ओळींमधला दातृत्वभाव जपणारे अनेकजण समजामध्ये आहेत.अशाच विचाराने समाजातील गरीब होतकरू मुलांसाठी जावली तालुक्यातील हुमगावच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील दहावीच्या सन ९७-९८ च्या माजी विद्यार्थ्यांकडून सामाजिक बांधिलकी जोपासत महायोगी गगनगिरी वसतिगृहतील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात दिला आहे.त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनियर कॉलेज हुमगाव येथील सन 1997 98 या वर्षीच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा नुकताच स्नेहमेळावा संपन्न झाला.यावेळी या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन आपल्या विद्यालयासाठी मदत तर केलीच.यावेळी समाजाभिमुख उपक्रमांतर्गत गरीब विद्यार्थ्यांसाठी मदत करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. परिसरातील कापसेवाडी येथे गेली 21 वर्षे अविरतपणे सुरू असलेल्या महायोगी गगनगिरी विद्यार्थी वसतिगृहाची सर्वांनी माहिती घेतली. या विद्यार्थ्यांबरोबरच विद्यालयातील होतकरू व गरीब मुलांनाशिक्षणाला हातभार लावण्याचा निश्चय करण्यात आला.यानुसार सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपले योगदान देत येथील मुलांसाठी शालापोयोगी साहित्य देऊन त्यांना मदतीचा हात दिला आहे.
यावेळी श्री निलेश तरडे ,सीमा पार्टे यांनी मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.याप्रसंगी प्रशांत तरडे, विलास गोळे, शुभांगी तरडे,राहुल चव्हाण, संतोष पिसाळ,बाळासाहेब नवले,सुधीर शेलार,समीर मोमीन,विवेक शिंदे,निखिल पवार,सचिन परामणे,नितिन पोफळे,कमलेश सणस आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक श्री जयवंत तरडे सर यांनी प्रास्ताविक केले.
.------------------------------
दहावीच्या सन ९७-९८च्या आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत सामाजिक दायित्वाच्या भावनेतून हा छोटासा उपक्रम हाती घेतला आहे. आमच्याकडून शालापोयोगी साहित्य मिळाल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला.याचे मनस्वी समाधान वाटते. यानंतरच्या काळातही आम्ही असेच सामाजिक उपक्रम सुरू ठेवणार आहोत.
अजय रांजणे अध्यक्ष -माजी विद्यार्थी संघ