सोमेश्वर रिपोर्टर टीम----
लोणंद : प्रतनिधी
लोणंद परिसरातील दूचाकीचोरीच्या घटना वारंवार घडत असतात, अशा घटनांत अनेकदा तक्रार देऊनही चोरटे सापडतीलच याची शाश्वती नसते. मात्र यावेळेस लोणंद पोलीसांनी एकाच आठवड्यात चोरीस गेलेल्या दोन गुन्हयातील मोटरसायकली आणि त्या चोरणारे तीन चोरटे यांना ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.
लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ९ जुलै आणि ११ जुलै रोजी मोटरसायकल चोरीच्या दोन घटनांची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. सदर गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल धस यांच्या सूचनांनुसार लोणंद पोलीसांनी शहरातील तसेच लोणंद फलटण रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तसेच मिळालेल्या माहितीवरून पुनित सुरेश दुरगुडे वय २८ वर्षे रा. सावतामाळी मंदिराशेजारी लोणंद ता खंडाळा, वैभव गोपाळ गोवेकर वय २० वर्षे रा. कोरेगाव ता. फलटण व एक अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली असून त्यांनी चोरलेल्या मोटरसायकली तपासासाठी जप्त करण्यात आल्या आहेत.
सदर कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापु बांगर, उविभागीय पोलीस अधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनानुसार सपोनि विशाल वायकर, पोलीस हवालदार चंद्रकांत काकडे, संतोष नाळे, पोलीस नाईक नितीन भोसले, श्रीनाथ कदम, सर्जेराव सुळ, अमोल पवार, सतिश दडस, अभिजीत घनवट, केतन लाळगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल मेघा ननवरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.