सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुरंदर तालुक्यातील नीरा नदीवरील वीर धरणाच्या पाणीसाठ्यात मागील आठवड्यापासून पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसाने आज दि २६ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत वीर धरणाचा पाणीसाठा ६७.२१ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. मागील तीन दिवसांपासून धरण क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे.
नीरा खोऱ्यातील नीरा - देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी या धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने संततधार हजेरी लावल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे. यावर्षी मान्सून पावसाने नीरा खोऱ्याला हुलकवणी दिली असली तरी मात्र आता उशिरा का होईना पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरुवात केली आहे.
आज बुधवार दुपारी चार वाजेपर्यंत भाटघर धरण क्षेत्रात ३४८ मी.मी पावसाची नोंद झाली असून ५९.६७ टक्के पाणीसाठा झाला आहे. निरा देवघर धरण क्षेत्रात १२०७ मीमी पावसाची नोंद झाली असून ७४ टक्के धरण भरले आहे. तसेच वीर धरण क्षेत्रात १०३ मी.मी पावसाची नोंद झाली असून ६७.२१ टक्के धरण भरले आहे. तर, गुंजवणी धरण क्षेत्रात ८२४ मी. मी पावसाची नोंद झाली असून ६२.०२ टक्के धरण भरले आहे.