सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नरखेड : प्रतिनिधी
नरखेड तालुक्यातील सावरगाव येथील पत्रकारास अश्लील ,जातिवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या शाळा संचालकविरोधात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने नागपूर ग्रामीण पोलीस उप अधीक्षक विजय माहुलकर याना देण्यात आले.
आज मंगळवार दि. १८ रोजी नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुभाष वऱ्हाडे, सरचिटणीस संजय देशमुख, मराठी पत्रकार परिषदेच्या प्रदेश महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, नरखेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश गिरडकर व पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपअधीक्षक यांची भेट घेतली. नरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत मागील ४ जुलै रोजी सावरगाव येथील ट्रायअम्प कॉन्व्हेंटची शिक्षण विभागाने परवानगी नाकारल्यामुळे पन्नास ते साठ पालक शाळा सोडल्याचा दाखला मागण्याकरिता जमा झाले होते. शाळा व्यवस्थापन समिती पाल्यांचा दाखला देत नसल्यामुळे काही पालक शाळेच्या समोर गोळा झाले होते. या बातमीचे वृत्तांकन करण्यासाठी स्थानिक पत्रकार गेले होते. पालकांची बाजू ऐकल्यानंतर यावर शाळा संचालकांची (राईट -टू-रिप्लाय) प्रतिक्रिया घेण्यासाठी दैनिक लोकमतचे प्रतिनिधी (पत्रकार) योगेश गिरडकर यांनी संस्थाचालक बंडू ऊर्फ तुकाराम किसन तागडे रा.मालापूर ह.मु.नागपूर यांना त्यांच्या मोबाईल क्रमांक 8208081943 वर संपर्क केला. यावर प्रतिक्रिया न देता चिडून जाऊन पत्रकार योगेश यांना, माझ्या कॉन्व्हेंटची बातमी देतो का? असे म्हणत जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केली. तसेच, आई बहिणी विषयी अपशब्द वापरले आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
अशा प्रकारे बातमीवर आपली प्रतिक्रिया देताना निष्पक्षणे दोन्हीही बाजू ऐकून वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला धमकी देण्याचा प्रकार निषेधार्हय आहे. योगेश गिरडकर हे लोकमत या वृत्तपत्राचे प्रतिनिधी असून नागपूर जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य व नरखेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. एका जबाबदार वृत्तपत्र पत्राच्या पत्रकाराला शिवीगाळ व धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध त्याच दिवशी सावरगाव येथील पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यात आली. परंतु आरोपीविरुद्ध फक्त भादवी कलम ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटना गंभीर असून या घटनेनंतर त्या परिसरात पत्रकारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सदर प्रकरणाची माहिती घेऊन सदर प्रकरणातील आरोपींविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. सदर विषय नागपूर पोलीस अधीक्षक यांच्यासमोर ठेवणार असून निष्पक्षणे कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन पोलीस उपअधिक्षक माहुलकर यांनी दिले. यावेळी नरखेड तालुका पत्रकार संघाचे ज्ञानेश्वरराव बालपांडे, सहदेव वैद्य, योगेश गिरडकर, पप्पू महंत, लक्ष्मीकांत पटेल, अनिल बालपांडे उपस्थित होते.