सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांना लोणंद पोलिसांनी एका खाजगी साखर कारखान्याच्या मशिनरी देखभाली प्रकरणात लाखोंचा गंडा घातल्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल रात्री उशिरा करण्यात आली. तत्पूर्वी सातारा पोलिसांच्या लोणंद पोलिसांच्या पथकाने लोढा यांच्या निवासस्थानी चौकशी केल्याचे समजते. त्यानंतर लोढा यांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील कापाशी येथील शरयु ॲग्रो इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याची जवळपास एक कोटी चौदा लाख रुपयांची फसवणूक झालेली असून, यात लोढा यांच्यासह एक ठेकेदार तसेच शरयू इंडस्ट्रीज लि. चे तीन इंजिनिअर सहभागी असल्याच्या तक्रारीवरून लोणंद पोलिसांत एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी शरयु ॲग्रो इंडस्ट्रीज लि. कारखान्याचे संचालक अविनाश शिवाजी भापकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. शरयु ॲग्रो इंडस्ट्रीज लि. या कंपनीमध्ये इंजिनिअरींगची विविध प्रकारच्या कामांचा करार सन 2021 मध्ये फॅब्रिक्स इंडस्ट्रीज तर्फे वसंत लोढा व ॲक्युरेट इंजिनिअरींग अण्ड इरेक्शन यांचे तर्फे प्रसाद आण्णा यांच्या सोबत करण्यात आला होता. करारावेळी कोटेशनबरोबर वरील दोन्ही आरोपींनी त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रामध्ये कामाचा अनुभव असल्याबाबतचे शासनाचे शिक्के व सह्या असलेले दाखले जोडलेले दिले होते. वर्क ऑर्डर दिल्यानंतर त्यांना मोठी रक्कम अदा करण्यात आली. परंतु फॅब्रिक्स इंडस्ट्रीज तर्फे वसंत लोढा व ॲक्युरेट इंजिनिअरींग ॲन्ड इरेक्शन यांचे तर्फे प्रसाद आण्णा यांनी कंपनीचे वर्क ऑर्डरप्रमाणे काम केले नाही व कामास टाळाटाळ करु लागले. त्यावेळी आम्ही वसंत लोढा व प्रसाद आण्णा यांनी दिलेली कागदपत्रे तपासली असता ती कागदपत्रे बनावट, खोटे व तयार केलेली असल्याचे लक्षात आले आहे. वरील दोघांनीही महाराष्ट्र शासनाची वेगवेगळ्या सरकारी, निमसरकारी कंपन्यांचे खोटे दाखले व सही शिक्के तयार करुन, त्याचा दुरुपयोग व फसवणुक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच या फसवणूक प्रकरणात केलेल्या कामांची तपासणी केली असता कंपनीमध्ये बाहेरुन नवीन साहित्य आलेले नसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये तसेच गेटवरील इनवर्ड आऊटवर्ड वहीतील नोंदीवरुन दिसून येत आहे. कंपनीमधील संतोष पोपटराव होले (सिनिअर इंजिनीअर), महादेव अनंत भंडारे (चिफ इंजिनिअर), संजय अनिरुद्ध मुळे (सिनिअर इंजिनिअर) यांना पैशाचे आमिष देऊन कंपनीमधील मशिनरी व साहित्य, पॅनल बॉक्स, पाईप हे सर्व नवीन टाकले आहे. तसेच नवीन काम केले, असे भासवून वसंत लोढा आणि प्रसाद आण्णा यांनी फसवणूक केल्याची तक्रार आहे.
कंपनीची फसवणूक केलेली रक्कम त्यांना वेळोवेळी मागणी करुनही त्यांनी सदरची रक्कम कंपनीमध्ये जमा केलेली नसल्याने अखेर कंपनीने या सर्वांवर भादंवि कलम 34, 408, 420, 467, 468, 471 नुसार फसवणूकीचा गुन्हा लोणंद पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. त्यानुसार लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर यांच्या पथकाने अहमदनगर शहरात येऊन कोतवाली पोलिसांच्या मदतीने अहमदनगर मधील वसंत लोढा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या गुन्हयात संतोष पोपट होले ,रा. जाधववाडी, ता. फलटण, सातारा, महादेव अनंत भंडारी, रा कराड जि. सातारा अशा दोघेजणांना अटक करण्यात आली असून त्यांना पाच दिवसाची कस्टडी देण्यात आली आहे. तर संजय अनिरुद्ध मुळे, रा उंबरे, ता. पंढरपूर व प्रसाद उर्फ आण्णा प्रभाकर हे दोघे आरोपी अजूनही फरार आहेत. पोलीस पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
या गुन्हयातील आरोपी वसंत लोढा यांना अहमदनगर येथून लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोउनि विशाल कदम, पोहवा,संतोष नाळे, पोना श्रीनाथ कदम, संजय चव्हाण, सर्जेराव सुळ, पो.काॅ.अभिजीत घनवट, विठ्ठल काळे यांच्या पथकाने ताब्यात घेवून चौकशीसाठी लोणंद पोलीस ठाण्यात आणले आहे. याबाबत अधिक तपास सपोनि विशाल वायकर करीत आहेत.