सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
जेष्ठ पत्रकार तसेच सोमेश्वर रिपोर्टरचे कार्यकारी संपादक दत्ता माळशिकारे यांनी डिसेंबर २००४ मध्ये वडगाव निंबाळकर येथील स्वतंत्र पुर्व काळातील वडगाव निंबाळकरचे शेवटचे राजे द्वाराकोजी उर्फ बाळासाहेबराजे निंबाळकर यांची मुलाखत घेतली होती ती अप्रकाशित राहिली होती. क्रांतिसिंह नाना पाटीलांच्या जयंतीनिमित्त वाचकांसाठी आम्ही प्रकाशित करीत आहोत.
स्वतंत्रपुर्व काळात क्रांतीसिंहनाना पाटील यांची ओळख पत्री सरकार अशी बनली होती. स्वतंत्र लढ्यात जी लोक मदत करत नाहीत अशा बरेच लोकांना त्यांनी पत्र्या ठोकल्या होत्या व यामुळेच त्यांची देशभर दहशत निर्माण झाली होती. अशाच प्रकारे एक दहशतीचे पत्र बारामती तालुक्यांतील स्वातंत्र्यपुर्व काळातील वडगाव निंबाळकरचे द्वाराकोजी उर्फ बाळासाहेबराजे राजेनिंबाळकर यांना आले होते. स्वातंत्र्याच्या कामात मदत करा अन्यथा पायात पत्र्या ठोकल्या जातील हे फर्मान द्वाराकोजी उर्फ बाळासाहेब राजे यांना आले.फर्मान हातात पडताच राजे भितीने गर्भगळीत झाले. यावर काय करावे त्यांना सुचेनासे झाले शेवट निरा ता.पुरंदर येथे असणाऱ्या पोलीस स्टेशनमधील पोलीस व त्यांचे स्नेही नामदेव शेळके यांना ते फार्मान दाखवले. यावर शेळके म्हणाले की, हे जरी घाबरण्यासारखे फर्मान असले तरी आपण अजिबात घाबरु नका कारण पत्री सरकार निरेत कधी येतात ते मला माहित आहे. ते ज्या रेल्वेने प्रवास करतात ती रेल्वे आपल्या निरा येथे पाणी भरण्यासाठी अर्धा तास थांबते.ती रेल्वे जेव्हा थांबेल त्यावेळी मी क्रांतीसिंह नाना पाटील यांचेसोबत तुमची भेट घडवुन देतो. शेळके यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे या दोघांची भेट घडवुनही दिली. रेल्वेच्या डब्यात एका समोरच्या बाकावर प्रचंड मोठी रुबाबदार देहयष्टी असलेले नाना पाटील बसले होते. मी त्यांच्यापुढे उभ राहिल्यावर त्यांनीच स्वता:हुन माझ्या पाठीवर हात ठेवुन मला त्यांच्यासोमरच्या सीटवर बसवुन घेतले तेव्हाच मला खुप मोठा आधार वाटला. माझ्या खांदयावर हात ठेवत ते म्हणाले, राजे तुम्हीच सांगा आपण लोकांनी अजुन किती वर्ष पारतंत्र्यात राहणार? इंग्राजांची गुलामी सहन करणार? आपण जर याकामी पुढे आलात तर आपला देश लवकर स्वतंत्र होईल. याकामी राजे मला मदतीचा शब्द दया. यावर मी त्यांना थरथर कापतच विचारले, मी कशी मदत करु ते आपण सुचवा. त्यावर नाना पाटील म्हणाले मुर्टी मोढवे परीसरात बारामती, गुनवडी, पणदरे येथील स्वतंत्रासाठी इंग्रजांविरोधात लढणारे भुमिगत कार्यकर्ते वास्तवास असुन त्यांचे जेवणाचे हाल होत आहेत. गावातील रामोशी समाजातील लोकांना तुम्ही शिधा दिलात तर त्या लोकांची व्यवस्था होईल. मी नाना पाटील यांना शिधा देण्याचा शब्द दिला व तो तंतोतंत पाळलाही. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर नाना पाटील आमदार झाल्यावर वाणेवाडी येथील वामनराव भोसले या त्यांच्या नातेवाईकांकडे आले असता ते आमच्याकडे आमच्या राजवाडयावर नाना पाटलांना घेवुन आले. तेव्हा त्यांचा मी यथोचित सत्कार केला. त्यावर ते मला म्हणाले, राजे तुम्ही माझा शब्द पाळला म्हणुन मी स्वता:हुन आपल्या राजवाड्यावर आलो. यावर राजे म्हणाले स्वातंत्र्य सेनानी मधला सेनापती आज माझ्या घरी आला माझ्या जीवनातला हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे .
COMMENTS