सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : प्रतिनिधी
देशभक्ती , राष्ट्रप्रेम निर्माण होण्यासाठी आयोजित उपक्रमातुन नविन पिढीला उत्तेजना मिळेल . देशभक्ती वाढीस लागेल. या उपक्रमातुन मातृभुमी विषयी जनजागृतीची भावना निर्माण होण्यास मदत होईल. आपण विर जवानांचा जो सन्मान सोहळा आयोजित केला यातुन देश भक्तीची बिजे रुजली जातील असे उद्गार सुभेदार लहुराज मानकर यांनी काढले.
करंदोशी ता. जावली येथे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये माझी माती माझा देश अभियान अंतर्गत वीरांचे वंदन या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग कदम आणि मुख्याध्यापक पटेल सर यांच्या हस्ते लेफ्टनंट ओंकार मानकर, शहीद सिपाही तेजस मानकर यांचे विरपिता तसेच हवलदार शशिकांत मानकर यांचे बंधू सेवानिवृत्त सुभेदार लहुराज मानकर, जवान विजय महामुलकर यांचे चुलते भगवान महामुलकर, सी आर पी एफ जवान विनोद पांडुरंग महामुलकर यांचे पिता पांडुरंग महामुलकर, जवान मयूर विठ्ठल महामुलकर यांचे पिता विठ्ठल महामुलकर , कै. माजी सैनिक लक्ष्मण बाळा महामुलकर यांच्या पत्नी धर्माबाई महामुलकर या मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
प्रारंभी सन्माननीय विरपिता, वीरमाता यांच्या शुभहस्ते विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतीमेचे पुजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शकील पटेल सर यांनी केले. दिलीप महामुलकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व मान्यवरांचे देशाप्रती असणारे भव्य योगदान कायम स्मरणात ठेऊन आम्ही सर्व ग्रामवासी आपल्या त्यागाप्रती कृतज्ञ आहोत अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शकील पटेल सर यांनी केले तसेच आभार आणि सूत्र संचालन उपशिक्षक निगडे सर यांनी केले. वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.