सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : प्रणाली देशमुख
इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना रिंगचा भाग मुरूम व मातीसह विहिरीत कोसळून त्यामध्ये दुर्दैवाने कामगारांचा मृत्यू झाला आहे.
सदरच्या दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखाची मदत राज्य शासनाच्या वतीने देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. हर्षवर्धन पाटील हे मुंबईत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन म्हसोबाचीवाडी दुर्घटनेची माहिती दिली व मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्याच्या मागणीचे पत्र देऊन चर्चा केली. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, माझ्या इंदापूर मतदार संघातील मौजे म्हसोबाचीवाडी येथे मंगळवार दि. 1 ऑगस्ट 23 रोजी विहिरीला रिंग टाकण्याचे काम सुरू असताना, कामाच्या ठिकाणी असणारा मातीचा व मुरूमाचा ढिगारा खचून विहिरीत कोसळला व त्यामध्ये मौजे बेलवाडी ता. इंदापुर जि. पुणे येथील १) सोमनाथ लक्ष्मण गायकवाड वय - ३२ वर्ष, २) जावेद अकबर मुलाणी वय - ३० वर्ष, ३) परशुराम बन्सिलाल चव्हाण वय - ३० वर्ष व ४) मनोज मारूती चव्हाण वय - ४० वर्ष या चार मजूरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर मृत कामगारांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने सर्व कुटुंबीयांना शासनाने तात्काळ भरीव आर्थिक मदत करण्याची गरज आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार मृत्यू कामगाराच्या कुटुंबियांना प्रत्येकी रु.5 लाखाचे अर्थसहाय्य राज्य शासनाकडून देण्याचे जाहीर केले, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
______________________