सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भिगवण : आकाश पिसाळ
म्हसोबावाडी येथील विहीर दुर्घटना घडून झालेल्या मजुरांच्या मृत्यू बाबत विहीर मालक गिरीश विजय क्षीरसागर तसेच कंत्राटदार विश्वास गायकवाड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. या प्रकरणी विहीर मालक गिरीश क्षीरसागर याला अटक करण्यात आले आहे.
म्हसोबावाडी येथील विहिरीच्या रिंग बांधण्याचे काम सुरु असताना मातीचा ढिगारा ढासळून त्याखाली जावेद अकबर मुलानी ,सोमनाथ लक्ष्मण गायकवाड ,परशुराम बन्सीलाल चव्हाण ,लक्ष्मण मारुती सावंत हे ४ मजूर गाडले गेले होते.मंगळवारी घडलेल्या या घटनेची माहिती त्याच रात्री उशिरा मिळाली होती.भिगवण पोलीस ठाण्यात याची खबर मिळताच त्यांनी तातडीने सर्व प्रशासकीय यंत्रणाना माहिती देत मजुरांच्या शोध कार्याला सुरवात केली होती. अक्राळविक्राळ विहीर आणि गाडल्या गेलेल्या मजुरांना जिवंत काढण्यासाठी प्रशासन सर्व ते प्रयत्न करीत होते.पुणे येथून यासाठी एन डी आर एफ पथकाला पाचारण करण्यात आले होते.मात्र अनेक प्रयत्न करूनही कामगारांना जिवंत काढणे प्रशासनाला शक्य झाले नाही आणि जवळपास ७० तास चाललेल्या बचाव आणि शोध पथकाच्या हाती ४ हि मजुरांचे मृतदेह मिळून आले.यावेळी नातेवाइकांनी मृतदेह ठेवलेल्या अम्बुलंस समोर लोटांगण घेत न्याय देण्याची मागणी केली.तर विहीर मालक आणि कंत्राटदार याना आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली.पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने नातेवाईकांची समजूत काढून या प्रकारणी दोषींवर कठोर शासन करण्याची ग्वाही दिली.याच संदर्भात भिगवण पोलिसांनी विहीर मालक गिरीश क्षीरसागर आणि रिंगचे कंत्राट घेणाऱ्या विश्वास गायकवाड विरोधात याठिकाणी काम करताना मजुरांच्या जीवाला धोका होवू शकतो याची कल्पना असताना आणि कोणत्याही प्रकारची सुरक्षेच्या बाबींचा उपयोग न केल्यामुळे मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे.तर क्षीरसागर याला तातडीने अटक करण्याची प्रकिया पूर्ण केली आहे.