सोमेश्वर रिपोर्टर टीम---
भोर : संतोष म्हस्के
पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर ता.भोर येथे आम्ही पोलिस आहोत, पुढे एका महिलेचा खून झाला असून आपण आपल्या अंगावरील दागिने अंगावर न ठेवता रुमालात बांधून ठेवा.असे सांगून हातचलाखी करीत दोन भामट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाकडून २ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवार दि.३ घडली. प्रकाश रामचंद्र बगाडे (वय- ७७, रा. नसरापुर ता. भोर) अशी आर्थिक फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून दोन अनोळखी भामट्यांविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नसरापूर - वेल्हे रस्त्यावरील नसरापूर गावच्या हद्दीत असणाऱ्या पुलाजवळ एका चिकन सेंटर शेजारी आर्थिक फसवणूक झालेले ज्येष्ठ नागरिक प्रकाश बगाडे गुरुवारी सकाळी अकराच्या दरम्यान उभे होते. यावेळी अनोळखी भामटे त्यांच्याजवळ आले व आम्ही पोलिस असून पुढे एका महिलेचा खून झाला आहे. तरी आपण आपल्या अंगावर सोन्याचे दागिने न ठेवता बांधून ठेवावे अशी बतावणी केली.दरम्यान प्रकाश यांनी अंगावरील सोन्याची दीड तोळ्याची चैन व अर्ध्या तोळ्याची अंगठी काढली असताना दोन भामट्यांनी हातचलाखी करून सदरचे दागिने रुमालात बांधल्याचे भासवले.यावेळी या भामट्यांनी रुमालात दागिने न ठेवता हातचलाखी करून दोन तोळे सोने गायब केले. सदर गुन्ह्याची नोंद राजगड पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे करीत आहेत.