खंडाळा ! रियटरमध्ये १७५० कामगार कंपनीमध्ये कामावर तर ३५० कामगार संपावर : रियटरमध्ये सहा महिन्यात दुसऱ्यांदा बेकायदेशीर संपाने कंपनीचे मोठे नुकसान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
खंडाळा :  प्रतिनिधी 
विंग ता.खंडाळा येथील रिएटर कंपनीत गेल्या सहा महिन्यात दुसऱ्यांदा संप झालेला आहे.काही मूठभर पदाधिकारी कायदेशीर बाबी समजून न घेता संपावर गेलेले आहेत व त्यांनी ३५० सह- कर्मचाऱ्यांना वेठीस धरले आहे यामुळे कंपनीच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे.काही मूठभर व्यक्तींच्या स्वार्थापोटी वारंवार संप कृती करून औद्योगिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न दिसत असल्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे.
    ऑगस्ट २०२१ मध्ये युनियन नोंद केल्यानंतर व्यवस्थापनाने कोणताही त्रास युनियन किंवा त्यांच्या सभासदांना दिला नाही. याउलट एप्रिल २०२२ मध्ये सर्व कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ दिली.मार्च २०२२ मध्ये औद्योगिक न्यायालय सातारा यांनी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन यांना मान्यताप्राप्त युनियन म्हणून आदेश पारीत केला.रियटर इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन या युनियनने व्यवस्थापनाला वारंवार शासकीय कार्यालयात विविध खोट्या तक्रारी करून त्रास दिला.कंत्राटी कर्मचाऱ्यांसंबंधीची तक्रार कामगार आयुक्त कार्यालयात वारंवार करून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा रोजी रोटीचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला.औद्योगिक व उच्च न्यायालयात विविध खटले दाखल करून कंपनीला नाहक त्रास दिला असे असताना देखील कंपनी व्यवस्थापनाने आकस ठेवून किंवा सूडबुद्धीने कोणत्याही कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली नाही.जानेवारी २०२३ च्या संपकाळात व तदनंतर युनियनच्या काही सभासदांनी कंपनीत उत्पादन कमी देणे, प्रक्रियेत बाधा आणणे,वरिष्ठांना अर्वाच्य भाषेत बोलणे,इतर सह कर्मचाऱ्यांवर दबाव आणणे इ. प्रकारची गैरकृत्य केली आहेत. त्यासाठी कंपनीने संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कायदेशीर प्रक्रिया पार पाडून नैसर्गिकरित्या कायदेशीर कार्यवाही केली आहे तसेच युनियनचे सभासद व इतर काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी कंपनीच्या भारतातील इतर शाखा कार्यालयात पाठवले आहे.ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करणे हा त्यामागचा उद्देश आहे असे प्रशिक्षणासाठी पाठवलेले व ग्राहक सेवेसाठी प्रतिनियुक्तीवर काही काळासाठी पाठवलेले कर्मचारी त्वरित परत बोलवावेत आणि शिस्तभंगाची कारवाई स्थगित करून सर्वांना पुन्हा कामावर घ्यावे या अवास्तव व अव्यावहारिक मागण्या पुढे करून संप चालू ठेवला आहे.कंपनीने संपाची नोटीस मिळाल्यानंतर बहुतांश कर्मचाऱ्यांशी संवाद साधून सदर मागण्यांसाठी संप करण्याची गरज आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर,एकाही कर्मचाऱ्याने त्याबद्दल बोलण्याचे टाळले अशा स्थितीत कर्मचाऱ्यांचा एकमुखी पाठिंबा या संपाला आहे असे दिसून येत नाही.परिणामी सदर बेकायदेशीर संप चालू आहे.यावरून संबंधित कर्मचारी कोणत्यातरी दडपणाखाली असल्याचे जाणवते.सदर संपाची नोटीस व इतर संबंधित कागदपत्रे यूनियनने सहाय्यक कामगार आयुक्त सातारा आणि मा.कामगार आयुक्त पुणे यांना दिलेली नाही.युनियनने  सदर संप टाळावा अथवा संप सुरूच झाला तर शासकीय यंत्रणांची मध्यस्थी होऊन संप लवकर मिटावा हा मार्ग बंद केला.अशा बेकायदेशीर संपामुळे कंपनीचे आणि कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागलेले आहे.आजही कंपनी जे कर्मचारी येऊन शिस्तीत कामावर हजर होतील व उत्पादन योग्य त्या प्रमाणात योग्य त्या प्रतीचे देतील त्यांना कसलाही त्रास होणार नाही याची कंपनीने सर्वांना कल्पना दिलेली होती परंतु आजपर्यंत कोणीही कामावर हजर झालेले नाही.
To Top