सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरोळ : प्रतिनिधी
काळमवाडी धरणापासून कृष्णेच्या संगमा पर्यंत दूधगंगा नदी काठावरील शेतकरी एक झाला असून कोणत्याही परिस्थितीत इचलकरंजी शहराला दूधगंगेतील पाणी देणार नाही याबाबत चर्चाही नाही आणि पाणी नाही असा आमचा ठाम निर्धार असल्याचे प्रतिपादन माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले ते शिरोळ तालुक्यातील दूधगंगा बचाव कृती समितीचा शिरोळ तहसीलदार कार्यालयाच्या मोर्चाचे नेतृत्व करत असताना बोलत होते. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील भवानीसिंग घोरपडे प्रमुख उपस्थित होते.
तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना निवेदन देण्यात आले निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलकांच्या तीव्र भावना जिल्हाधिकारी व महाराष्ट्र शासनापर्यंत यांच्याकडे तातडीने पाठवणार असल्याचे सांगितले.
दूधगंगा बचाव कृती समितीमार्फत इचलकरंजी शहराला मंजूर झालेली सुळकुड अमृत दोन योजना रद्द करावी या मागणीसाठी आज शिरोळ तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता मोर्च्याची सुरुवात शिरोळ शहरातील ऐतिहासिक शिवाजी तक्तापासून झाली. पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत मोर्चाची सुरुवात झाली शहरातील मुख्य मार्गावरून हा मोर्चा शिरोळ तहसील कार्यालयात आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले
या सभेत बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले इचलकरंजी शहराने पंचगंगा नदी दूषित करून शिरोळ तालुक्यावर अन्याय केला आहे हा अन्याय आम्ही किती दिवस सहन करणार असा प्रश्न उपस्थित करून त्यांना शुद्ध पाणी व आम्ही दूषित पाणी का प्यायचं व त्यांना शुद्ध पाणी आम्ही का द्यायचे . विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वारणा योजने काढली होती ती मोडीत निघाली आता पुन्हा पाच वर्षांनी निवडणुका लक्षात घेऊन दूधगंगा योजना काढली आहे ही योजना आम्ही कदापि यशस्वी होऊन देणार नाही. आमच्या शुद्ध व हक्काच्या पाण्यासाठी आमचा लढा कायम राहणार आहे यात कोणतेही राजकारण येणार नाही . जिल्हास्तरावरून कृती समिती स्थापन करून दूधगंगा नदीतून पाणी देण्यास दूधगंगा नदीकाठी वरील गावातून तीव्र स्वरूपात विरोध होत आहे या कृती समितीच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यातील सर्व जनता एकत्र येऊन या लढ्याला बळ देईल असे आश्वासनही त्यांनी दिले
माजी आमदार उल्हास पाटील यांनी काळमवाडी धरणाचा व राजापूर धरणाच्या बांधकामाचा इतिहास सांगून देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या कार्याचे कौतुक करून जिल्ह्यातील सर्व नद्यांचे पाणी शिरोळमधूनच कर्नाटकात जाते पण सर्वजण आमच्यावरच अन्याय करत आहेत हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. आमचं पाणी आम्ही कुणालाही देणार नाही प्रसंगी आम्ही जेलही भोगायला तयार आहे पंचगंगा अशुद्ध करणाऱ्यांनी पंचगंगेतील पाणी घ्यावे हीच जर भाषा त्यांना कळत नसेल तर आम्हालाही वेगळी भाषा बोलता येते कोणत्याही परिस्थितीत दूधगंगेतून इचलकरंजी शहराला पाणी देणार नाही प्रसंगी रस्त्यावरची लढाई करू असा सज्जड इशारा त्यांनी दिला
दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले शिरोळ तालुका हा जागृत तालुका आहे आपल्या हक्काचे पाणी कुणालाही देण्याचे नाही यावर आम्ही ठाम आहोत दूधगंगा कृती समितीच्या निर्णयाबरोबर कायम राहणार आहोत. राज्यकर्ते निवडणुकीच्या तोंडावरच पाणी योजनेचे राजकारण करीत आहेत शिरोळ तालुक्यातील जनतेवर अन्याय करून पाणी कोणाला देणार असतील ते कदापिही खपवून घेतले जाणार नाही असे त्यांनी सांगितले
शिरोळ तालुक्यातील दत्तवाड घोसरवाड टाकळीवाडी नवे दानवाड जुने दानवाड हेरवाड अब्दुल्लाद शिरदवाड शिवनाकवाडी सीमा भागातील बोरगाव मलिकवाड ,नंनदी सदलगा वडगोल एकसंबा कल्लोळ हिरेकुडी तर कागल तालुक्यातील सुळकुड सांगाव कागल बिद्री या गावातून शेतकरी मोर्चा उपस्थित होते .
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव, दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील सुळकुडचे अमोल शिवई सांगावचे मनोज कोडोले, बोरगावचे अण्णासाहेब हावले, मलिकवाडचे बाळासाहेब पाटील पुंडलिक खोत नंदीचे संपतराव थोरात, मल्लू हवलदार, आंदोलन अंकुशचे धनाजी चूडमुंगे दीपक पाटील दानवडचे सरपंच डॉ. सी डी पाटील कृती समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, सूर्यकांत चौगुले, बाबुराव पोवार, सुरेश पाटील, विवेक चौगुले , युवराज घोरपडे राजू पाटील उपसरपंच मनीषा चौगुले माजी सरपंच कांचन चौगुले, यांच्यासह नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------
मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता.
-----------------------------------------------------------------
दुधगंगा नदीच्या पाण्यावरून सुरू झालेल्या आंदोलनात आजी-माजी खासदार विरुद्ध आजी-माजी आमदार असा लढा शिरोळ तालुक्यात सुरू असल्याचे आज स्पष्ट झाले .
----------------------------------------
आमदार जयंत पाटील यांचा निषेध
इचलकरंजी शहराला पाणी देण्यासाठी सुरू असलेल्या अमृत योजनेला सुळकुड मधून पाणी द्यावे असे सांगणाऱ्या सांगली जिल्ह्यातील आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा या मोर्चात निषेध करण्यात आला त्यांच्या निषेधाचा ठराव शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती भवानीसिंग घोरपडे यांनी मांडला