सोमेश्वर रिपोर्टर टीम----
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद ते निरा दरम्यान पालखी मार्गावरील पाडेगांव पाटी नजीक भवानी माता मंदिराजवळील उतारावर दूचाकी आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला असल्याचे समजत आहे .
ठिकठिकाणी सदोष असलेल्या पालखी मार्गावरील जीवघेण्या अपघातांची मालिका चालूच आहे. दि. १६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पालखी मार्गावरील लोणंद ते निरा दरम्यान असलेल्या पाडेगाव हद्दीतील भवानीमाता मंदिराजवळील तीव्र उताराला असताना ओव्हरटेकींग करण्याचा प्रयत्न करत असताना अज्ञात चारचाकी वाहनाची धडक बसून दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरील तरूण हा कोरेगाव ता. कोरेगाव येथील अविनाश लक्ष्मण बर्गे (वय २८) असून तो कोरेगाव येथून पुण्याला चाललेला होता.
दरम्यान या अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी लोणंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कय्युम मुल्ला, हवालदार सर्जेराव सुळ, क्षीरसागर व अभिजीत घनवट यांनी धाव घेत रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत केली तसेच ठार झालेल्या मोटारसायकल स्वाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठविण्यात आला.
सदर अपघातातील मृत तरूण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव ता.कोरेगाव येथील असल्याचे समजत आहे. सदर अपघात एवढा भीषण होता की मोटारसायकल स्वाराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. हा भीषण अपघात बघून घटनास्थळी जमलेल्यांचा थरकाप होत होता. सदर दुचाकीस्वार बर्गेचा साथीदार भोसले हा त्याच्याच पाठिमागे काही अंतरावर दूसऱ्या दुचाकीवर होता. अपघातानंतर तोच सर्वप्रथम अपघाताच्या ठिकाणी पोहचला , आपल्या मित्राचा अपघाती मृत्यू झाल्याचे पाहून त्याने मोठ्यानं हंबरडा फोडला. दोघेही कोरेगाव येथून दोन दुचाकीवरून पुण्याला जाण्यासाठी एकाच वेळेस निघालेले असताना पाडेगाव जवळ अविनाश बर्गे याच्यावर काळाने घाला घातला. रात्री उशिरा या अपघाताची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात करण्याचे काम चालू होते. सपोनि सुशिल भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार लोणंद पोलीस याप्रकरणी अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.