पुरंदर-बारामती ! विजय लकडे ! दुष्काळाची दाहकता वाढली : पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
बारामती व पुरंदर तालुक्यात यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी मेटाकुटीला आला असून हातातोंडला आलेल्या पिकांची राखरांगोळी झाली असून आता जनावरांच्या  पाणी आणि चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. 
        कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्याचा काही भाग वगळता पश्चिम महाराष्ट्रात विशेषता पुरंदर तालुका व बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पावसाने दडी मारल्याने दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. बारामती तालुक्याचा जिरायती भाग असलेल्या मोरगाव ,सुपा ,पळशी ,कानडवाडी, वाकी, चोपडज चौधरवाडी या भागातील दुष्काळ सदृश परिस्थितीचा मोठा परिणाम पशुधनावर झालेला दिसत आहे. या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण बऱ्याच अंशी दुग्ध व्यवसायावर अवलंबून असते यंदा या भागात एकही मोठा पाऊस न झाल्याने बळीराजा हतबल झालेला दिसत आहे. बारामतीच्या जिरायती भागातील शेतकऱ्यांची ऊस मका कडवळ ही उभी पिके पाण्या वाचून वाळून गेली आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे , प्यायलाच पाणी नाही तर जनावरांना पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न येतोच कुठे ॽ अशी अवस्था येथील शेतकऱ्यांची झाली आहे.
बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील 60 गावातील मोठी जनावरे (गाय व म्हैस ) यामध्ये मोठी 61,828. तर लहान 6,387असे एकूण 68,695 जनावरे आहेत . यापैकी शेळी मेंढी एकूण संख्या 40352 इतकी आहे. या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे .
सध्या बहुतांश गावात पिण्याच्या पाण्याची टँकरची गरज निर्माण झाली आहे . काही गावांमध्ये दानशूर व्यक्तींनी स्वखर्चाने गावाला पाणीपुरवठा चालू केला आहे. तर वाकी ,चोपडज ,पळशी,  कानाडवाडी या भागात दिवसाआड व दोन दिवसात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ग्रामपंचायत करत आहे . वाकी गावातील शेतकरी मिननाथ जगताप , राजेंद्र भापकर, दत्तात्रय गाडेकर यांनी या भागातील शेतकऱ्यांसाठी पशुधन वाचवायचे असेल तर चारा छावणी सुरू करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
To Top