सोमेश्वर रिपोर्टर टीम------
माळेगाव : प्रतिनिधी
मराठा क्रांती मोर्चाच्या धसक्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मोळी पुजनाला येण्याचे टाळल्याने मराठा समाजाचे आंदोलन यशस्वी ठरले.
सध्या राज्यात मराठा बांधवांना मराठा आरक्षण मिळावे यासाठी अंदोलनाचा वणवा पेटला आहे यातच जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्री,आमदार,खासदार यांना गावबंदी करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केल्याने राज्यात अनेक गावात ठराव होऊन मंत्र्यांना गावबंदी केली होती.
असे असताना बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याच्या प्रशासनाने यावर्षीच्या गळीत हंगामाची सुरवात उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मोळी टाकून शुभारंभ करण्याचा घाट घातला होता मात्र मराठा क्रांती मोर्चा बारामती यांनी तीन दिवसांपूर्वी हा कार्यक्रम करु नका अन्यथा मंत्र्यांना मोळी टाकु दिली जाणार नाही त्या ऐवजी कारखाना प्रशासनाने महिला सभासद, चेअरमन व मराठा आंदोलनकर्त्यां महिलांच्या हस्ते मोळी टाकावा असा प्रस्ताव दिला होता याबाबतीत आंदोलक व पोलीस बांधवांची चर्चा आंदोलकांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे निष्फळ ठरली.
अखेर मराठा अंदोलक यांचा विरोध पहाता या कार्यक्रमाला येण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाळले यामुळे चेअरमन केशव जगताप व मराठा अंदोलक महिला शारदा खराडे,सुजाता जगताप,अरुणा जगताप,सिध्दी पवार,लतिका खलाटे यांच्या व सर्व संचालक मंडळ,सभासद,कामगार यांच्या उपस्थितीत गव्हाणीत उसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
--------------------
माळेगाव कारखान्याचे अध्यक्षपद केशव जगताप यांना मिळुन अवघा एक महिना झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गळीत हंगामाची सुरुवात करण्याचा त्यांचा मानस होता मात्र मराठा आंदोलकांच्या आक्रमक धोरणामुळे कारखाना प्रशासनाच्या मनसुब्यांना धक्का पोहोचला कारखान्याच्या इतिहासात प्रथमच असा बाका प्रसंग घडला असुन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रशासनापुढे मोठं आव्हान आहे.