सोमेश्वर रिपोर्टर टीम------
माळेगांव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील क-हावागज येथील हॉटेल शारदाच्या मालकाला २५ हजारांची खंडणी मागणाऱ्या चौघांविरुद्ध माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुनील सुरेश आवाळे रा.मोरगाव रोड, ढवाणवस्ती, बारामती यांनी फिर्याद दिली असून आरोपी इंद्रजीत माणिक सोनवणे (रा.क-हावागज ता.बारामती) व इतर तीन अनोळखी इसम (नाव व पत्ता माहीत नाही) अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे क-हावागज ता . बारामती हद्दीतील हॉटेल शारदा येथे कांउटरवर असताना आरोपी इंद्रजीत सोनवणे व इतर तीन जण त्यांच्या अल्टो ८०० गाडीत येऊन हॉटेलमध्ये जेवण करुन जाताना बिल मागितले असता आरोपीने मी इथला भाई आहे.मला ओळखत नाही का ? असे म्हणत शिवीगाळ करु लागला.
यावेळी हॉटेल मधील कामगार महाविर दलवीरसिंग रावत हा समजुन सांगत असताना चौघांनी त्याला कॉटेजमधे नेऊन हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांना ढकलून देण्यात आले.तुला जर हॉटेल चालवायचे असेल तर आम्हाला २५ हजार रुपये महिन्याला खंडणी द्यावी लागेल नाहीतर तुला गोळ्या घालून ठार जीवे मारण्याची धमकी दिली व आरोपी इंद्रजीतने गल्ल्यात हात घालून मोजुन ठेवलेले दहा हजार रुपये घेऊन अल्टो गाडीत चौघेजण बसून निघून गेले.
याबाबत पोलीस नाईक सादिक शेख यांनी फिर्याद दाखल करून घेतली असून तपास पोसई खटावकर करीत आहेत.