भोर ! संतोष म्हस्के ! झेंडूला मातीमोल बाजार...उत्पादन खर्च ही निघाला नाही : शेतकऱ्यांच्या सणावर विरजण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात दसऱ्याच्या सणाला झेंडूच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी झेंडूचे मळे फुलवले होते.मात्र दसऱ्याला झेंडूला मातीमोल बाजार मिळाल्याने शेतकऱ्यांनी दसऱ्यादिवशी रस्त्यावरच फुले टाकून दिली.
      वर्षभराचा संसाराचा गाडा हाकण्यासाठी आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून भोर तालुक्यातील बहुतांशी शेतकरी दरवर्षी पावसाच्या अंदाजावर झेंडूचे मळे तयार करीत असतात.यंदा सुरुवातीच्या काळात पावसाने योग्य साथ दिल्याने सर्वत्र झेंडू फुलांचे मळे तयार केले गेले.झेंडू उत्पादन मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा उच्चांकी झाले.परिणामी दसऱ्याच्या सणाला बाजारात झेंडू फुले मागणीच्या चार पटीने जास्त आल्याने नवरात्रीत ६० रुपये प्रतिकिलो विक्री केली गेलेली फुले दसऱ्यादिवशी १० रुपये किलोने शेतकऱ्यांना विकावी लागली.तर सायंकाळच्यावेळी अक्षरशा अनेक शेतकऱ्यांना हीच फुले बाजारभाव पूर्णतः ढासळल्याने तसेच झालेला खर्च परवडत नसल्याने बाजारपेठेतील रस्त्यावर फेकून द्यावी लागली.
दसऱ्याला झेंडूने आशांची निराशा केली
       यंदा पावसाने योग्य साथ दिल्याने तालुक्यातील झेंडू उत्पादकांचे झेंडूचे मळे उत्कृष्ट फुलले होते.यामुळे दसऱ्याला तालुक्याच्या चोहीकडून शेतकऱ्यांचा भोरच्या बाजारपेठेत फुलांचा माल भरघोस आला.परिणामी बाजारभाव मातीमोल झाल्याने झेंडूने शेतकऱ्यांच्या आशांची निराशा केली असे झेंडू उत्पादक समाधान चौधरी यांनी सांगितले.
To Top