बारामती ! ऐन दिवाळीच्या तोंडावर 'सोमेश्वर'ची साखर तापली : दिवाळीला ३० ऐवजी १० किलो साखर दिल्याने सभासदांमध्ये तीव्र नाराजी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सभासदांसाठी दिवाळीसाठी  30 किलो साखर देण्याची मागणी सभासदांनी निवेदनाद्वारे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्याकडे केली आहे. सोमेश्वरने गेल्या वर्षी सभासदांसाठी 30 किलो साखर देण्याचा निर्णय घेतला होता मात्र यावर्षी दहा किलो साखर  देण्याचा निर्णय घेतला असल्याने सभासदांच्या मध्ये तीव्र नाराजी असून सोशल मीडियाद्वारे  सभासदांनी आपली भावना व्यक्त केली आहे. शनिवार( दि.7 ) रोजी बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष ऍड. नवनाथ भोसले, वाघळवाडीचे उपसरपंच गणेश जाधव, सदस्य तुषार सकुंडे, मुरूमचे माजी सरपंच प्रदीप कणसे, श्रीरंग बापूसो सोसायटीचे चेअरमन अमर होळकर आदी सभासदांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. साखरवाढ निर्णय न झाल्यास कारखान्याच्या गेट समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सभासदांनी दिला आहे. 
               मागील काळामध्ये प्रति शेअर्स भाग पाच किलो साखर देण्याचा निर्णय घेतला होता परंतु यामध्ये बदल होऊन प्रति शेअर ऐवजी  प्रति सभासद कार्ड  पाच किलो सवलतीची साखर देण्यात आली. यामुळे सभासदांना कमी साखर मिळत आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणाकरिता प्रति सभासद कार्ड  30 किलो साखर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चालू वर्षी संचालक मंडळाने या निर्णयात बदल करून सभासदांना प्रति सभासद दहा किलो साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एक भाग शेअर्स असणारे सभासद बहुसंख्य असून या सभासदांसाठी मासिक पाच किलो आणि दिवाळीसाठी दहा किलो साखर देण्याचा निर्णय झाल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे एक भाग असणाऱ्या सभासदांना दिवाळीसाठी 30 किलो साखर देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी सभासदांनी निवेदनाद्वारे कारखान्याकडे केले आहे. यावर निर्णय न झाल्यास दीपावलीच्या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन साखर वाढवून देण्याची मागणी करण्यात येणार आहे.
To Top