सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगांव:- प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील तरडोली येथे दुध दरवाढीबाबत सुरु असलेल्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज मोरगाव बारामती हा पुणे जिल्हा मार्ग क्र ६५ सुमारे १ तास अडवुन घोषणाबाजी सहीत तिव्र आंदोलन केले . यावेळी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या प्रतीमेला जोडे मारुन रस्त्यावर दुध ओतून शासनाविषयी तिव्र संताप व्यक्त केला.
राज्यातील शेतकऱ्यांना दुध दर वाढ मिळावी यांसह अनेक मागण्यांसाठी बारामती तालुक्यातील तरडोली येथील सागर जाधव रविवार दि १ पासून उपोषण सुरु केले होते. उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. या निमित्ताने स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोरगाव बारामती रस्ता रोको करण्यात आला होता. या आंदोलनासाठी तरडोली, मोरगाव, मुर्टी, बाबुर्डीसह पुरंदर व इंदापुर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कदम यांनी सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांच्या दुरावस्थेला केवळ शासनच जबाबदार आहे. सध्याच सरकार असो वा यापूर्वीचे सरकार असो हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नसलेल्यानेच आज राज्यातील शेतकऱ्यांना उपोषणाचा मार्ग पत्करावा लागत आहे. तसेच येथील शेतकरी विजय भोसले यांनी बोलताना सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावभेट दौऱ्या दरम्यान मंदीरासाठी १५ लाख रुपये घोषीत केले. मात्र शेतकऱ्यांना पुरंदर उपसा सिंचनचे पाणी मिळण्यासाठी एक पैसा ही दिला नाही . इंग्रजांच्या निती प्रमाणे सध्याचे सरकार मंदीर व देव देवतांमध्ये नादवत असून मुख्य मागणी पासून दुर ठेऊ पाहत आहे. शेतकरी व स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या मनोगतानंतर दुग्ध विकास मंत्री यांच्या प्रतीमेला जोडे मारो आंदोलन केले. तसेच शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध ओतून तीव्र आक्रोश व्यक्त केला. यानंतर हे आंदोलन संपुष्टात आले.
COMMENTS