फलटण ! फुले ०२६५ प्रमाणेच फुले १५०१२ क्रांती करणार ? पाडेगावच्या ऊस संशोधन केंद्रातून उस बेणेची पहिली मोळी पडली बाहेर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पाडेगाव : विजय लकडे
सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षत्रात फुले २६५ ने  शेतकऱ्यांना छप्पर फाडके पैसे मिळवून दिले होते  त्याचप्रमाणे फुले ऊस १५०१२ क्रांती करणार? हे पाहावे लागणार आहे. नुकतीच पाडेगावच्या ऊस संशोधन केंद्रातून फुले १५०१२ उस जातीची पहिली मोळी बाहेर पडली आहे. 
          महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावच्या मुलभूत ऊस बियाणे विक्रीचा शुभारंभ दि.०९ रोजी करण्यात आला. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, व मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख, ऊस विशेषज्ञ, डॉ. राजेंद्र भिलारे यांचे हस्ते सतिश काकडे, निंबूत, धोंडीबा दाईगुंडे, सोलापूर,  अनिल जमदाडे, वाई, नामदेव सकुंडे, वाघळवाडी या प्रगतशील शेतकऱ्यांना फुले ऊस १५०१२ या ऊस वाणाच्या बेणेमळ्यातील पहिली मोळी देवून बियाणे विक्री व वाटपाला शुभारंभ करण्यात आला. 
          साखर कारखाने आणि शेतकरी बांधवांनी दर तीन वर्षातून एकदा बियाणे बदल करणे गरजेचे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पादनाबरोबर कारखान्याचे सुध्दा साखर उत्पादन आणि साखर उतारा वाढण्यासाठी मदत होते. बदलत्या हवामानानुसार प्रत्येक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात किमान ४ ते ५ वाणांची लागवड करणे गरजेचे आहे. जेणेकरून साखर उद्योग आणि शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होईल. सुरूवातीला सोमेश्वर कारखाना चालविण्यासाठी ऊसाची कमतरता भासत असल्यामुळे शेजारील जिल्हयातून गेटकेन करून ऊस आणावा लागत होता. परंतू, पाडेगाव संशोधन केंद्राने सन २००७ मध्ये प्रसारित केलेल्या फुले २६५ वाणामुळे सन २००९-१० मध्ये कारखाना कार्यक्षेत्रात फुले २६५ या वाणाची अधिक उत्पादन व साखर देणाऱ्या वाणाची लागवड झाल्यामुळे कारखाना ऊस पुरवठयाबाबत स्वयंपूर्ण झाला. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमुळे स्वतःच्या बंगला, ट्रॅक्टर यावर २६५ ची कृपा' असे नावे दिली. असा अधिक ऊस उत्पादन व साखर देणारा वाण निर्मित व संशोधन केल्याबद्दल पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे कौतुक केले. सध्याची पाणी टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता पाडेगाव संशोधन केंद्राने प्रसारीत केलेल्या फुले ऊस १५०१२ आणि फुले ऊस १३००७ या पाण्याचा ताण सहन करणारे आणि चोपण जमिनीत अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणाची शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लागवड करावी. तसेच सद्यः परिस्थितीत प्रत्येक कारखाना कार्यक्षेत्रावर ऊस लागवड कमी झाल्यामुळे यावर्षी शेतकरी बंधूने जास्तीत जास्त खोडवा ठेवून संशोधन केंद्राने विकसित केलेले आधुनिक खोडवा व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन पुरुषोत्तम जगताप यांनी केले.
पाडेगाव संशोधन केंद्राने ६६ एकर क्षेत्रावर विविध ऊस वाणांचे मुलभूत बियाणे मळे तयार केले आहेत. ऊसाच्या मुलभूत बियाण्यापासून कारखान्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात पायाभूत बेणे मळे तयार करून शेतकऱ्यांना बेणे पुरवठा करण्यात येतो. सध्या प्रामुख्याने २०२२ साली या संशोधन केंद्राने महाराष्ट्रासाठी शिफारशीत केलेली फुले ऊस १५०१२ आणि राष्ट्रीय स्तरावर द्विकल्पीय उष्णकटीबंधीय प्रदेशामधील ७ राज्यांसाठी प्रसारीत झालेली फुले ऊस १३००७ या वाणाचे मोठया प्रमाणावर मुलभूत बियाणे मळे केंद्रामार्फत तयार केलेले आहेत. त्याबरोबर को ८६०३२, फुले २६५, फुले १०००१, फुले ९०५७, फुले ११०८२ या वाणांचे बियाणे उपलब्ध होणार आहे. चालू वर्षी साधारणपणे १.५० कोटी दोन डोळा टिपरी बियाणे विक्रीस उपलब्ध होणार आहे. सर्व साखर कारखाने आणि शेतकऱ्यांनी पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे बियाणे वापरण्याचे आवाहन डॉ. राजेंद्र भिलारे, ऊस विशेषज्ञ, ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी केले आहे.
संशोधन केंद्राने प्रसारित केलेले नवीन ऊस वाणाबाबत माहिती देताना डॉ. सुरेश उबाळे यांनी फुले ऊस १५०१२ हा ऊसाचा वाण को ८६०३२ पेक्षा अधिक ऊस उत्पादन व फुले २६५ पेक्षा अधिक साखर देणारा वाण आहे असे सांगितले. चोपण जमिनीमध्ये हा वाण अत्यंत चांगले उत्पादन देत असून पाण्याचा ताण सहन करतो. तसेच रसवंतीसाठी सुध्दा हा वाण चांगला आहे. हा वाण किड व रोगास मध्यम प्रतिकारक आहे. सन २०२३ मध्ये राष्ट्रीय स्तरावर ७ राज्यामधील प्रायोगीक चाचण्यामध्ये प्रथम आलेला पाडेगाव संशोधन केंद्र प्रसारित मध्यम पक्वता गटातील वाण फुले ऊस १३००७ आहे. हा वाण अधिक फुटवे, ऊस उत्पादन व साखर देणारा असून क्षारपड जमिनीत चांगले उत्पादन देतो. त्याचबरोबर पाण्याचा ताण सहन करणारा आहे. हा वाण किड व रोगास मध्यम प्रतिकारक आहे.
१ गुंठा लागवडीसाठी दोन डोळयाची २५० टिपरी लागतात. त्याच्या माध्यमातून पुढील वर्षी १२५० ऊस तयार होतील व दोन डोळयाची २५००० टिपरी उपलब्ध होतील. अशा प्रकारे १ गुंठे प्लॉटमधून १ हेक्टर क्षेत्रावर लागवड करता येईल. को ८६०३२, फुले ०२६५, फुले १०००१ व फुले ९०५७ या वाणाचे बियाणे ऊसाच्या दोन डोळयाच्या १००० टिपरीचा तोडणी आणि भरणीसह विक्रीचा दर रु. १७८०/- असा आहे. तसेच नवीन वाण फुले ११०८२, फुले ऊस १५०१२ आणि फुले ऊस १३००७ या वाणाचा १००० टिपरीचा विक्रीचा दर रु.५१८०/- असा आहे. ऊस मोळयाच्या माध्यामातून बेण्याची विक्री होईल. पाडेगाव ऊस संशोधन केंद्र शेतकरी आणि साखर कारखाने यांच्या प्रगतीकरीता निरंतर प्रयत्नशील आहे असे मत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे मा. संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी व्यक्त केले. पाडेगाव संशोधन केंद्राने प्रसारीत केलेल्या
      नवीन ऊस वाणांच्या बेण्याचा सर्व साखर कारखान्यांनी नवीन लागवडीसाठी उपयोग करावा असे आवाहन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले आहे. या कार्यक्रमावेळी ऊस संशोधन केंद्रातील ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे, ऊस रोगशास्त्रज्ञ डॉ. सुरज नलावडे, ऊस किटकशास्त्रज्ञ डॉ. शालीग्राम गांगुर्डे, ऊस शरीरक्रियाशास्त्रज्ञ डॉ. कैलास भोईटे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक जितेंद्र निगडे, मुख्य शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड आणि ऊस विकास अधिकारी, विराज निंबाळकर, वरीष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. सुरेश उबाळे, डॉ. रणजितसिंह निंबाळकर, डॉ. दत्तात्रय थोरवे, कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. किरणकुमार ओंबासे हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन डॉ. थोरवे यांनी केले.
---------------------
या केंद्रातून बियाणे खरेदीसाठी बियाणे विक्री अधिकारी डॉ. दतात्रय थोरवे मो. ९८८१६४४५७३ आणि डॉ. किरणकुमार ओंबासे ७५८८९४४९८६ यांचेशी कार्यालयीन वेळेत सकाळी ०८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत संपर्क साधावा.
To Top