सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पूर्वेकडील सारोळा ते गुनंद तसेच भोंगवली फाटा ते माहूरखिंड रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून संबंधित ठेकेदार के.डी.सोनवणे यांना भविष्यात या रस्त्याचे काम देऊ नये तसेच ठेकेदाराचे नाव काळया यादीत टाकावे.
ठेकेदाराचे काळया यादीत नाव न टाकल्यास १२ डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थानिकांनी दिला असून याबाबतचे निवेदन भोरचे तहसीलदार सचिन पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय वागज यांना दिले आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील सदर दोन्ही रस्त्याचे डांबरीकरण सात महिन्यापूर्वी झाले होते.नव्याने केलेल्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असतानाही नवीन तयार केलेल्या रस्त्यावर खड्डे पडलेच कसे ?असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले होते. यावेळी स्थानिकांनी विरोधही केला परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने याकडे कानाडोळा केला.यावेळी संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यात आर्थिक वाटाघाटी झाली की काय? तसेच संबंधित ठेकेदारास राजकीय वरदहस्त कुणाचा ? अशी संतापजनक चर्चा स्थानिकांमध्ये होत होती.
ठेकेदार के. डी. सोनवणे यांना भविष्यात रस्त्याचा ठेका देण्यात येऊ नये तसेच त्यांचे नाव काळया यादीत टाकावे. सोनवणे यांचे नाव काळया यादीत न टाकल्यास १२ डिसेंबरला ११ वाजता भोंगवली फाटा येथे रास्ता रोको करणार असल्याचा इशारा दिला आहे. हे आंदोलन स्थानिक व सर्व पक्षाच्या वतीने होणार असल्याचे निवेदन स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजय वाघज व भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले आहे.