जावली ! ओंकार साखरे ! मेढ्यातील एसटी आगारात टॉयलेटला पाणीच नाही : प्रवाशांचे हाल, तर पाणी टँकरला निधीच नसल्याची आगराची माहिती

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मेढा - ओंकार साखरे
 मेढा येथिल एसटी डेपो आगारात पिण्याच्या पाण्यापासून टॉयलेटच्या पाण्यापर्यत गैरसोय असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत तर पाण्याचा टँकर मागविण्यासाठी निधी नसल्याचे वाहतुक नियंत्रक अमर पवार यांनी सांगीतले.
          सध्या कार्तिकीवारी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या असते. यामध्ये कार्तिक वारीसाठी महाड, रायगड या भागातील भाविकांची संख्या मोठी असून सातारा - मेढा - महाबळेश्वर मार्गे वाहतुक करणे सोयीचे होत असल्याने एसटी महामंडळाच्या सर्व गाड्या महाडकडे जाताना मेढा आगारात थांबत आहेत. परंतु आगारात पिण्यासह टॉयलेटला पाणीच नसल्याचे दिसून आल्याने वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
            एसटीने प्रवास करून महामंडळाचे उत्पन्न वाढविणाऱ्या प्रवाशांना आगारातील पाण्याच्या गैरसोयीचा फटका बसला. सध्या मेढा नगर पंचायतीकडून होणारा पाणी पुरवठा गेले पंधरा दिवसा पासून कमी जादा प्रमाणात होत असून अजूनही नियमित पाणी पुरवठा करण्यात नगरपंचायत अपयशी ठरली आहे. 
            गत अनेक दिवस पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असताना मेढा आगाराकडून टँकरने पाणीपुरवठा करून प्रवशांना सेवा पुरविणे गरजेचे होते. राज्यामध्ये मेढा आगाराने क्रमांक पटकविला असताना सेवा पुरविण्यात आगार कुचकामी ठरली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 
            याबाबत आगार प्रमुखांशी संपर्क केला असता टँकरने पाणी मागवून प्रवाशांची सोय करण्याचे आश्वासन आगार प्रमुख यांनी दिले असले तरी आगार प्रमुखांच्या सांगण्याला कोलदांडा दाखवत वाहतुक नियंत्रक अमर पवार यांनी मात्र टँकरला निधी उपलब्ध नसल्याने पाणी कोठून दयायचे असा प्रश्न उपस्थित करीत बिले मंजुर करत नसल्याचा वरिष्ठांवर आरोप बोलताना केला. त्यामुळे आगार प्रमुख सांगतात टँकर आणू तर कर्मचारी म्हणतात निधीच नाही अशा द्विधा परिस्थितीत मात्र प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालुन मेढा आगारातील पाणी प्रश्न मिटवावा अशी मागणी प्रवाशी वर्गातुन होत आहे. आगारातील टॉयलेट कायमच बंद ठेवुन प्रवाशांची गैरसोय करणाऱ्यांनी प्रवाशांसाठी टॉयलेटचे टाळे काढावेत अशीही मागणी होत आहे.
To Top