सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील बारा ग्रामपंचायतचे गावकारभारी निवडण्यासाठी आज मतदान घेण्यात येत आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच ही निवडणूक होत असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीतील अजित पवार गट, शिंदे सेना, आणि भाजप या सर्वच पक्षांनी पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये लक्ष घातले असून आपल्या विचारांच्या जास्तीत जास्त ग्रामपंचायती कशा येतील हाच त्यांचा प्रयत्न असल्याचे पाहायला मिळते आहे.
पुरंदर तालुक्यात आज एकूण १२ ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य निवडीसाठी मतदान घेण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने याबाबतची सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिली आहे. ही निवडणूक होत असताना अजित पवार गटाने सुरुवातीलाच बाजी मारली आहे. अजित पवार गटाने सुरुवातीलाच वाल्हे, आडाचीवाडी आणि सुकलवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध करत या ग्रामपंचायतींवर आपला सरपंच निवडून आणला आहे. मात्र पुरंदरच्या दक्षिण पूर्व पट्ट्यामधील मोठी ग्रामपंचायत असलेल्या गुळूंचे आणि त्याचबरोबर त्यालाच लागून असलेल्या कर्नलवाडी येथील निवडणूक ही अत्यंत चुरशीची होताना पाहायला मिळते आहे. गुळूंचे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश जगताप आणि कॉंग्रसचे उत्तम निगडे यांचा गट आपली गेलेली सत्ता पुन्हा आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर अनेक वर्ष राजकारणात राहिलेल्या आणि पुरंदर पंचायत समितीचे सभापतीपदी राहीलेल्या अजित निगडे यांच्या गटाला यावेळी गुळूंचे गावात आपली सत्ता कायम ठेवण्याचे मोठं आव्हान निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे यावेळी माजी सभापती अजित निगडे यांची सून सम्राज्ञी कौस्तुभ निगडे याच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचपदाची उमेदवार असल्याने अजित निगडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर सुरेश जगताप यांना देखील मागील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले होते. मात्र यावेळेस अशी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेण्याचा चंग सुरेश जगताप यांनी बांधला असून, त्यांनी कॉंग्रेच्या निर्मला उत्तम निगडे यांना सरपंचपदासाठी उमेदवारी दिली आहे. आपणच सर्व जागा जिंकून आणणार असा दावा त्यांनी केला आहे.
त्याचबरोबर गुळूंचे ग्रामपंचायतमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असकेले आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते अक्षय निगडे यांनी आपली आई यांना सिमा विजय निगडे सरपंच पदासाठी उभे केले असून ते स्वतः वार्ड नंबर दोन मधून सदस्यपदासाठी उभे आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची होईल असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.
त्याचबरोबर कर्नलवाडी ग्रामपंचायतमध्ये सुद्धा यावेळेस होणारी लढत ही चुरशीची होणार आहे. काँग्रेसचे असलेले माजी सरपंच सुधीर निगडे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष पृथ्वीराज निगडे यांनी मोठे आव्हान निर्माण केला आहे. मागील वेळेस सुधीर निगडे हे सरपंच होते मात्र मागील काळात झालेल्या कुरबुरीमुळे निगडे दोन गट वेगळे पडले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने काँग्रेसच्या सुधीर निगडे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण करण्यात आले आहे. सुधीर निगडे यांच्या गटाच्या वतीने अहिल्या शंकर वाघापूरे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उध्यक्ष पृथ्वीराज निगडे यांच्या गटाकडून सुवर्णा तानाजी महानवर यांना सरपंचपदासाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतीकडे तालुक्यातून लक्ष लागलेले आहे. आमदार संजय जगताप यांना या दोन्ही ग्रामपंचायती अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आमदार संजय जगताप सुद्धा या निवडणुकीकडे लक्ष देऊन आहेत. असं पाहायला मिळते आहे. मात्र आघाडीतील एकेकाळचे मित्र असलेल्या या दोन गटांमध्ये कर्नलवाडी तरी मोठी लढत पाहायला मिळणार आहे. तर तालुक्यातील इतर भागात सुद्धा अशाच प्रकारे चुरशीची लढत पाहायला मिळते आहे.
COMMENTS