जावली ! ओंकार साखरे ! बिसलरी बहाद्दरांना जनेतेच्या पाण्याचा टाहो समजेल का ? सामान्य जनतेचा सवाल : अनियमित पाणी पुरवठ्याने मेढ्यातील नागरिक त्रस्त

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
मेढा नगरपंचायत कडून होणारा जनतेला पिण्याचा पाण्याचा पुरवठा खंडीत झाला असून गत दहा पंधरा दिवस जनता पाण्यासाठी टाहो फोडत असताना पाणी पुरवठा करणारे कर्मचारी ठरविक विभागासाठी पाण्याचा पाऊस पाडत असल्याने त्या कर्मचार्यांच्या विरोधात जनतेतुन नाराजी व्यक्त होत आहे.
         कॅबीन मध्ये बसून बिसलरीने पाणी पिणाऱ्या बहादरांना जनतेच्या पाण्याचा टाहो समजेल का ? असा प्रश्न सुध्दा सामान्य जनतेतुन विचारला जात आहे.
           जावलीचे मुख्यालय असलेल्या मेढा शहरात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा अनियमित पाणीपुरवठा होत असून याला नागरिक त्रस्त झाले आहेत. ऐन दसरा दिवाळीच्या सणाला सुद्धा पाणी पुरवठा सुरळीत सुरु नसल्याने मेढा शहरातील नागरिकांनी नगरपंचायतीच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. 
         मेढा हे जावली तालुक्याचे मुख्य ठिकाण असून या शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मेढा शहरात सध्या पाणीपुरवठा अनियमितपणे होत असल्यामुळे मेढ्यातील नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. सध्या सणासुदीचा काळ सुरु आहे. मात्र याकाळात सुद्धा मेढा नगरपंचायतीकडून पाणीपुरवठा कधीच सुरळीतपणे सुरु नव्हता. सणासुदीत सुद्धा नळाला पाणी पाच पाच दिवसातून येत असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली आहे. नळाला पाणी आल्यावर पाणी अर्धा तास सुद्धा सुरु राहत नाही तसेच ५०० लिटर पाणी सुद्धा नळाला येत नाही. एखाद्या घरात हा दहा लोक असतील तर त्यांनी एवढ्या पाण्यात कसं भागवायच असा सवाल सुद्धा नागरिक यानिमित्ताने उपस्थित करत आहेत. 
              सण आले की पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारी जळत आहेत. आत्ताच हि अवस्था तर उन्हाळ्यात पाणी मिळेल का नाही. का पाण्यासाठी मेढ्यातील लोकांना स्थलांतर करावे लागेल अशी चर्चा सुद्धा मेढ्यातील व्हाट्सप ग्रुपवरून जोर धरत आहे. पाणी प्रश्नाची योग्य ती दखल नगरपंचयतीने, मुख्याधिकाऱ्यांनी तसेच नगरपंचायतीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी मेढ्यातील नागरिक करत असून या प्रश्नावर लवकर तोडगा न निघाल्यास हंडा मोर्चा काढून मोटारी सारख्याच का जळत आहेत याचा जाब प्रशासनाला विचारणार असल्याचे देखील नागरिकांनी सांगितले.
              वारंवार होणाऱ्या जळीताची आणि बिघाडाची चौकशी होणे गरजेचे असून मोटर दुरुस्तीच्या नावाखाली आर्थिक घोटाळे करणाऱ्यांच्या चौकशीची मागणी करण्यात येत आहे. ना हातपंप दुरुस्ती, ना हातपंप पाणी तपासणी, ना टीसीएलचा हातपंपासाठी वापर, ना पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता  मग जनतेच्या जिवीतासाठी नगरपंचायत नक्की करते काय असा सवाल जनतेतुन उपस्थित होत आहे. स्वच्छतेचा निधी दडपण्यासाठी चाललेली धडपड जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. ओला सुखा कचरा करीत लोकांच्या डोळ्यात कचरा टाकणाऱ्या नगर पंचायतीने जनेतेच्या पाण्याचा प्रश्न न मिटविल्यास तोच कचरा नगरपंच्या तीच्या डोळ्यात टाकायला वेळ लागणार नाही अशी भडक प्रतिक्रिया काहींनी बोलुन दाखविली आहे.

To Top