सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दीपक जाधव
सुपा मोरगाव रस्त्यावरील स्वागत परमिट बियर बार फोडलेल्या आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात सुपे पोलिसांना यश आले. त्यांच्याकडुन दोन वाहने व विदेशी कंपनीची दारु मिळुन सुमारे ८ लाख ५४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताजुद्दीन दस्तगीर शेख (मूळ रा. टाकळवाडी ता .फलटण ), गोरख काळूराम जाधव ( मुळ रा. बोरखेडी ता. सेनगा जि. हिंगोली ) मात्र दोन्ही सध्या रा. मलटण फाटा, शिक्रापूर, ता. शिरूर जि. पुणे, तर अर्जुन गुढेराव रणदिवे (मुळ रा. विळेगाव ता. देवणी जि. लातूर, सध्या रा. सणसवाडी ता. शिरूर ) आदी तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, सुपे नजीक भोंडवेवाडी अंतर्गत सुपे मोरगाव रस्त्यावर असणाऱ्या स्वागत बियर बार शनिवारी ( दि. २८ ऑक्टोंबर ) रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडुन त्यातील ८ लाख ५४ हजार किमतीची विदेशी दारुची चोरी झाल्याची फिर्याद बारचे मालक कैलास महादेव हिरवे यांनी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार येथील एपीआय नागनाथ पाटील यांनी तात्काळ गुन्हे प्रगटीकरण पथकाचे किसन ताडगे, महादेव साळुंके घटनास्थळी रवाना केले. यावेळी चोरी झालेल्या ठिकाणचे व रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. यावेळी दुचाकीवरुन क्र. ( एम एच २४ बी यु १२८२ ) एक आरोपी तर ईरटीगा चार चाकीतुन क्र. ( एम एच १२ एस क्यु १४२५ ) दोन जण अशा तिन आरोपीं चोरी केल्याचे दिसुन आले. त्यानुसार वाहनाच्या नंबरप्लेटवरुन माहिती घेतली असता शिक्रापुर परिसरातील असल्याची माहिती मिळाली.
त्यामुळे येथील सहाय्यक फौजदार ताकवणे, पोलीस हवालदार रुपेश साळुंखे, पोलीस अंमलदार किसन ताडगे, महादेव साळुंखे यांनी गुन्हयात वापरलेली वाहने व आरोपी यांना गुन्ह्याच्या तपास कामी शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्या तिघांना अटक करुन त्यांच्याकडुन वाहने व विदेशी कंपनीची दारु मिळुन सुमारे ८ लाख ५४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेतील तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंखे करीत आहेत.
या परिसरातील सर्व ग्रामपंचायतींनी आपआपल्या गावातील मुख्य रस्ते, चौक, मंदिर व हायवे वरील सर्व आस्थापना यांनी सुरक्षेतेच्या दृष्टीने व मालमत्ताविषयक गुन्हे कमी करण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत असे आवाहन सुप्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक नागनाथ पाटील यांनी केले आहे. ......................................