सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : महेश जगताप
होळ (ता. बारामती) ग्रामपंचायतीकडे १४ आणि १५ वित्त आयोगाचा तब्बल ७३ लाख निधी शिल्लक आहे. एकीकडे विकास कामासाठी निधी नसल्याची तक्रारी अनेक ग्रामपंचायती करत असताना निधी असूनही होळ ग्रामपंचायतीने निधीचा वापर ग्रामस्थांच्या विकासासाठी केलेला दिसत नाही. १५ व्या वित्त आयोगातून आजपर्यंत एकही रुपया खर्च झालेला नाही. दोन्हीही वित्त आयोगातून सुमारे ७३ लाख रुपये निधी ग्रामपंचायतीला विकास कामासाठी मिळाला आहे. ग्रामपंचायत विकास कामासाठी निधी खर्च व्हावा यासाठी होळ ग्रामपंचायत सदस्य दीपक वाघ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्जाद्वारे ग्रामपंचायतीने निधी खर्च करावा यासाठी सूचना देण्याची मागणी केली. दरवर्षी सरपंच आणि ग्रामसेवक बदलण्याची स्पर्धा या ग्रामपंचायतीत दिसून येते. याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामपंचायतीचा विकास व्हावा, ग्रामपंचायती सक्षम व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाने वित्त आयोगामार्फत थेट ग्रामपंचायत खात्यावर निधी जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यामागचा उद्देश गावांचा विकास व्हावा, गावे स्वावलंबी व्हावीत हा असताना निधी असूनही होळ ग्रामपंचायत पैसे खर्च करण्यास टाळाटाळ करत आहे. या पैशाचा उपयोग पुढील निवडणुकीसाठी करायचा आहे का? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. होळ ग्रामपंचायतीचा अजब कारभार चव्हाट्यावर आला असून तीन वर्षात तब्बल सहा ग्रामसेवक आणि तीन वर्षात तीन सरपंच झाल्या असल्याकारणाने विकास कामांना गती मिळत नाही. पंचायत समितीचे अधिकारी या घटनेकडे गांभीर्याने पाहत नसल्याने बारामती तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत निधी विकास कामाअभावी पडून आहे. रस्ते, दिवाबत्ती, पिण्याचे पाणी, गटारे, शैक्षणिक निधी, स्वच्छता आधी कामांसाठी हा निधी उपयुक्त ठरू शकतो. मात्र ग्रामपंचायत प्रशासन या विषयाकडे गांभीर्याने पाहत नसल्याने लाखोंचा निधी पडून आहे. वास्तविक या निधीचा वापर सर्वसामान्यांच्या विकासासाठी होणे आवश्यक आहे मात्र तसे होताना दिसत नाही. विकास कामांसाठी अधिकाऱ्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का अशी चर्चा ही होळ परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे.
..........
तीन वर्षात सहा ग्रामसेवक. तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे गाव म्हणून होळ गावची ओळख आहे. मात्र पदाधिकाऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या राजकारणात कंटाळून अनेक ग्रामसेवक या ग्रामपंचायतीकडे पाठ फिरवत आले आहेत. त्यामुळे तीन वर्षात सहा ग्रामसेवक यांनी या ठिकाणी सेवा बजावली आहे.