सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील ३७ पोस्ट ऑफिसचे डाक सेवक बेमुदत संपावर गेल्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील पूर्णता डाक सेवा ठप्प झाली आहे. परिणामी शासकीय कार्यालयांचा दररोजचा होणारा पत्रव्यवहार थांबला गेला आहे.
पोस्ट खात्याच्या ग्रामीण डाक सेवकांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत मंगळवार दि.१२ देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात भोर तालुक्यातील ३७ पोस्ट ऑफिस मधील ६० डाक सेवक सहभागी झाले आहेत. ग्रामीण भागातील डाक कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरू होणार असल्याचा इशारा अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेने दिला आहे.विभागीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारी रजा,घरभाडे भत्ता, टीएडीए ,पेन्शन मेडिकल सुविधा, शिक्षण भत्ता सुविधा लागू करण्यात याव्यात. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे काम कमिशन ऐवजी वर्कलोड मध्ये समाविष्ट करण्यात यावे या प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत संप घोषित करण्यात आला आहे.त्यानुसार डाक कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेल्यामुळे ग्रामीण भागातील बचत खाते भरणा, स्पीड बुकिंग वाटप, मुलाखत पत्र, मनी ऑर्डर ,सेवा रजिस्ट्री पत्र ,आरडी ,विज बिल भरणा, सुकन्या योजनेचे काम ठप्प झाले आहे.आंदोलनात दत्तात्रय गोळे, अश्विनी शिंदे ,सोहेल मनेर ,महेश मैद ,सुभाष साळेकर, संतोष बुदगुडे ,सविता भागवत ,वैशाली जेधे ,चंद्रकांत डाळ, दत्ता वरे आदींसह डाक सेवक सामील आहेत.